कॉलेज परिसरात जीवघेणा हल्ला; वाघोली पोलिसांचा कडक इशारा, आरोपींची काढली वरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:44 IST2026-03-18T10:41:31+5:302026-03-18T10:44:11+5:30
- दैनंदिन कामकाजातील वेळेत ५० टक्क्यांनी बचत; ९० टक्क्यांचे उद्दिष्ट

कॉलेज परिसरात जीवघेणा हल्ला; वाघोली पोलिसांचा कडक इशारा, आरोपींची काढली वरात
आव्हाळवाडी : वाघोलीतील रायसोनी कॉलेज परिसरात धारदार हत्याराने तरुणावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची वाघोली पोलिसांकडून कॉलेज परिसरात धिंड काढण्यात आली. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांमध्ये स्वागत होत आहे. रायसोनी कॉलेजच्या गेटसमोरील रस्त्यावर गुरुवारी (दि. १२ मार्च) दुपारी सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास नागेश हा मित्रांसोबत टी हाउसवर बसला होता. त्याचवेळी मंगेश सांगळे (वय २३, रा. वाघोली) आणि त्याचे दोन साथीदार दुचाकीवर तेथे आले. मित्राला शिवी का दिली, यावरून वाद झाला. त्यावेळी मंगेशने धारदार हत्याराने नागेशवर हल्ला केला.
हल्ल्यानंतर तिघे घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच, वाघोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत मुख्य आरोपी मंगेश सांगळे याला काही तासांत अटक केली. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये निर्भयतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सोमवारी (दि. १६ मार्च) सायंकाळी कॉलेज परिसरात या गुन्हेगारांची वरात काढली.
काही दिवसांपूर्वीही नंदकुमार गायकवाड वाघोली पोलिस स्टेशनला रुजू होताच महाविद्यालयीन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांची अशीच धिंड काढली होती. वाघोली पोलिसांकडून अशा गुन्हेगारांवर कारवाईची ही दुसरी वेळ आहे. शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अजिबात थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पोलिसांना माहिती द्यावी. गुन्हेगारांवर तातडीने आणि कठोर कारवाई करून परिसरात निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी वाघोली पोलिस कटिबद्ध आहेत, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.