इंदापूर तालुक्यात युरिया तुटवड्याने शेतकरी हैराण; कृषी केंद्रांवर कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:55 IST2025-08-08T18:55:14+5:302025-08-08T18:55:41+5:30
गेल्या दहा वर्षांत खत आणि औषधांचे भाव प्रचंड वाढले असताना शेतमालाचे भाव मात्र सातत्याने घसरत आहेत.

इंदापूर तालुक्यात युरिया तुटवड्याने शेतकरी हैराण; कृषी केंद्रांवर कारवाईचे आदेश
निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम कोरडा गेला आहे. अधूनमधून येणारे ऊन आणि सोसाट्याचा वारा यामुळे मका, बाजरी, ज्वारी यासारखी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असतानाच, युरिया आणि डीएपीसारख्या खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या दहा वर्षांत खत आणि औषधांचे भाव प्रचंड वाढले असताना शेतमालाचे भाव मात्र सातत्याने घसरत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, वेळेवर आणि योग्य दरात खते मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. काही कृषी केंद्र चालकांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, युरियाचा वापर दूध भेसळ आणि पशुखाद्यासाठी होत असल्याने त्याचा काळा बाजारही वाढला आहे.
युरियाचा कृत्रिम तुटवडा करणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने रद्द करावेत आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे यांनी सांगितले की, ‘युरियाचा तुटवडा हा कृत्रिम आहे. काही दुकानदार शेतकऱ्यांना इतर खते खरेदी करण्यास भाग पाडतात, ज्यामुळे शेतकरी आणि दुकानदारांमध्ये वाद होतात. युरियाचा काळा बाजार थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.’
शेतकऱ्यांनी युरिया तुटवड्यावर तत्काळ उपाययोजना आणि काळ्या बाजारावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. याकडे कृषिमंत्र्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन
तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी याबाबत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, ‘सर्व कृषी केंद्रांचा स्टॉक तपासला जाईल. ई-पॉस मशीनवरील स्टॉक आणि गोडावूनमधील प्रत्यक्ष स्टॉक यात तफावत आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. युरिया उपलब्ध असूनही न देणाऱ्या कृषी केंद्रांवर परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. शेतकऱ्यांनी तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.’