पिंपरी : सैन्यदलात नोकरीला लावण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून २२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. चार जणांना आर्मीचे बनावट ‘कॉल लेटर’ पाठविण्यात आले. तळवडे येथील त्रिवेणीनगरमध्ये फेब्रुवारी २०१९ ते २२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.दत्तात्रय साहेबराव कोकाटे (६५, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी १२ मे रोजी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाजीराव सखाराम पाटील (४५, रा. निघोजे, ता. खेड), संतोष शंकर ठाकूर (४०, रा. रावेत) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.संशयितांनी कोकाटे यांची सून, तिचा भाऊ अमोल फणसे, पुतण्या रोहित आणि फिर्यादी यांचे मित्र मोहन शिंदे यांच्या मुलाला सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी चौघांकडून एकूण २२ लाख ५० हजार रुपये घेतले. आर्मीचे बनावट कॉल लेटर तयार करून ते पाठवून विश्वास संपादन केला. मात्र, ते पत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ मोटे तपास करीत आहेत.
'आर्मीचे बनावट ‘कॉल लेटर’ अन्...' सैन्यात नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडेबावीस लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:55 IST