चितळ हरणांच्या मृत्यूचा खुलासा करा;अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 17:09 IST2025-07-27T17:09:22+5:302025-07-27T17:09:41+5:30

पंधरा दिवसांपूर्वी आठवडाभरात सलग एक-दोन हरणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुमारे चितळ प्रकारातील १६ हरणे दगावली होती.

pune news Explain the death of chital deer; Additional Commissioner warns of action | चितळ हरणांच्या मृत्यूचा खुलासा करा;अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा

चितळ हरणांच्या मृत्यूचा खुलासा करा;अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा

पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील १६ चितळ हरणांचा मृत्यू लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराने झाल्याचे न्याय वैद्यकीय परीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. आता यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांकडून याबाबतचा खुलासा मागविला आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये शंभरहून अधिक हरण आहेत. पंधरा दिवसांपूर्वी आठवडाभरात सलग एक-दोन हरणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुमारे चितळ प्रकारातील १६ हरणे दगावली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरणे दगावल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनाने मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशू रोग तज्ज्ञांनी केले होते. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी संकलित मृत हरणांचे जैविक राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर, ओरिसा, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर, राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविले होते.

पाठविलेल्या जैविक नमुन्यांपैकी प्राण्यांचे लक्षणे व प्रयोगशाळा, भुवनेश्वर तसेच राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्राकडून तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांना लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात हरणांचा मृत्यू झाल्याने महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांकडून याबाबतचा खुलासा मागविला आहे. यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे दिवटे यांनी सांगितले.

Web Title: pune news Explain the death of chital deer; Additional Commissioner warns of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.