उजव्या विचारसरणीच्या हिंसाचाराविरोधात कायदा करून दाखवा;डॉ. अजित नवलेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 10:55 IST2025-07-19T10:55:19+5:302025-07-19T10:55:35+5:30

- राज्य सरकारने आणलेल्या लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर एक लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा, निदर्शने, आंदोलने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

pune news enact a law against right-wing violence; Dr. Ajit Navale challenges the Chief Minister | उजव्या विचारसरणीच्या हिंसाचाराविरोधात कायदा करून दाखवा;डॉ. अजित नवलेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

उजव्या विचारसरणीच्या हिंसाचाराविरोधात कायदा करून दाखवा;डॉ. अजित नवलेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

पुणे : शहरी नक्षल वादानाच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरएसएस संविधानाला मानणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. डाव्या हिंसाचाराच्या नावावर ते कायदे आणत आहेत. फडणवीस यांनी उजव्या हिंसाचाराच्या विरोधात कायदा करून दाखवावा, असे आव्हान भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) राज्यसचिव डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. राज्य सरकारने आणलेल्या लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर एक लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा, निदर्शने, आंदोलने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारच्या जन सुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नवले बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, डॉ. महारुद्र डाके आदी उपस्थित होते.

डॉ. नवले म्हाणाले, जनसुरक्षा कायदा तयार करताना बेकायदा कृत्य किंवा कृती याची व्याख्या हेतूत: संदिग्ध ठेवण्यात आली आहे. परिणामी, सरकारच्या विरोधात किंवा सरकारी धोरणांविरोधात बोललेले, लिहिलेले भाषण, चिन्हे, हावभाव हेदेखील ‘सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे’ ठरविता येणार आहे. समाजमाध्यमांवर टाकलेली पोस्ट, व्यंग्यचित्र, कथा, कविता, विनोद, पत्रक, दिलेली प्रतिक्रिया बेकायदा कृत्य म्हणून चिन्हांकित केले जाऊ शकते. सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार यांच्यासह सर्वच नागरिकांच्या अधिकारांवर व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या कायद्यामुळे बंधने येणार आहेत.

हा कायदा नागरिकांच्या फायद्याचा नाही तर उद्योजकांच्या फायद्याचा आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात आम्ही राज्यात एक लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवणार आहोत, याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा, निदर्शने, आंदोलन करण्यात येणार आहे. या मोहिमेत विविध संस्था, संघटना, महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले. आमच्या पक्षाचे आमदार विनोद निकोले आणि इतर डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यपालांची भेट घेऊन या विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची विनंती करणार आहोत, असेही ते म्हणाले.

शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घ्यावी

महाविकास आघाडीचे जे प्रमुख तीन पक्ष आहेत. त्यांनी ज्या प्रकारे या विधेयकाविरोधात भूमिका घ्यायला हवी ती घेतलेली नाही. शिवाय महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांचीही भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे या विधेयकाला त्यांनी गांभीर्याने घ्यावे आणि विधेयकाविरोधात आमच्यासोबत रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही डॉ. नवले यांनी यावेळी केले. या लढाईत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्यांच्या सोबत निळा झेंडा असावा, अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: pune news enact a law against right-wing violence; Dr. Ajit Navale challenges the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.