8 वर्षांच्या आरिष्काने आईसोबत सर केला किलीमंजारो;आफ्रिकेचा सर्वोच्च शिखर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:11 IST2025-07-29T11:09:58+5:302025-07-29T11:11:17+5:30
४ जून रोजी तंजानियासाठी रवाना झाल्यानंतर त्यांनी ५ जूनला लेमोषो मार्गाने ८ दिवसांचा ५१ किमी लांबीचा अत्यंत आव्हानात्मक ट्रेक सुरू केला.

8 वर्षांच्या आरिष्काने आईसोबत सर केला किलीमंजारो;आफ्रिकेचा सर्वोच्च शिखर
- विशाल सातपुते
कोथरूड : पुण्यातील बावधन भागातील केवळ ८ वर्षांची आरिष्का लढ्ढा हिने आपल्या आई डिंपल लढ्ढासोबत आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो (१९,३४१ फूट) यशस्वीपणे चढाई करत विक्रम प्रस्थापित केला आहे. ११ जून रोजी आरिष्का आणि डिंपल या मायलेकींनी शिखरावर पाऊल ठेवत इतिहास रचला.
४ जून रोजी तंजानियासाठी रवाना झाल्यानंतर त्यांनी ५ जूनला लेमोषो मार्गाने ८ दिवसांचा ५१ किमी लांबीचा अत्यंत आव्हानात्मक ट्रेक सुरू केला.
खडतर चढाईनंतर ११ जूनच्या मध्यरात्री १२ वाजता त्यांनी बाराफू बेस कॅम्पहून अंतिम शिखर चढाईस सुरुवात केली. पौर्णिमेच्या चांदण्यात १० ते -१५ डिग्री सेल्सिअस या कडक थंडीमध्ये, थकवा आणि झोपेच्या अभावातही आरिष्का आणि डिंपलने आपल्या जिद्दीच्या जोरावर किलिमंजारोच्या उहुरू पीकवर पाऊल ठेवले.
शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनी भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलाचा सन्मान करणारा ‘ऑपरेशन सिंदूर’ चा बॅनर गर्वाने फडकावला. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या या विशेष मोहिमेला समर्पित ही चढाई वैयक्तिक आणि देशाभिमानाने भारलेला क्षण होता. ती आशिया, युरोप आणि आता आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर गाठणारी जगातील सर्वांत तरुण पर्वतारोहकांपैकी एक ठरली आहे. आरिष्का आणि डिंपल लढ्ढाच्या या यशामुळे केवळ पुणेच नाही, तर संपूर्ण भारताचा अभिमान उंचावला आहे. जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांची उंची गाठण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.