वाकडेवाडीत चालक-वाहकांचे विश्रांतिगृह की कोंडवाडा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 10:40 IST2025-12-12T10:39:46+5:302025-12-12T10:40:07+5:30
कर्मचाऱ्यांना आरोग्याचा व प्रवाशांना अपघाताचा धोका

वाकडेवाडीत चालक-वाहकांचे विश्रांतिगृह की कोंडवाडा ?
संजय चिंचोले
पुणे : वाकडेवाडी बसस्थानकातील वाहक-चालकांची विश्रांतिगृहे चक्क कोंडवाडा बनली आहेत. राज्यभरातून एसटी बस घेऊन येणाऱ्या चालक-वाहकांसाठी पुणे आगारालगत उभारलेल्या विश्रांतिगृहांची मात्र दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहांचे ड्रेनेजचे पाणी येत असल्याने वाहक-चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाय दुर्गंधीयुक्त सांडपाण्याने त्यांची अंथरूण-पांघरूणेदेखील ओली होत आहेत. अशा अवस्थेत राहणारे चालक-वाहक अक्षरश: नरकयातना भोगत आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून बस घेऊन येणाऱ्या चालक-वाहकांना पुरेशा आरामाची आवश्यकता असते; परंतु त्यासाठी साध्या विश्रांतिगृहाची व्यवस्थाही धड नाही. परिवहन विभागातील अधिकारी मात्र टोलवाटोलवी करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांवर एसटी बसमध्येच विश्रांती घेण्याची वेळ आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी अर्थात चालक-वाहकांसाठी बसस्थानक परिसरात विश्रांतिगृहे बांधणे बंधनकारक आहे आणि ती स्वच्छ व सुस्थितीत असावीत, याची जबाबदारी ही एसटी प्रशासनाची आहे. यासाठी स्वच्छता संस्था नेमणे आणि इतर सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे, जेणेकरून चालक-वाहकांना पुरेशी विश्रांती घेता यावी, हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे. मात्र वाकडेवाडी बसस्थानकात चालक-वाहकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून उघड झाले आहे. अस्वच्छ विश्रांतिगृहे आणि प्रसाधनगृहांची स्थिती पाहता, एसटी प्रशासनाला नैतिक जबाबदारीचे भानच नसल्याचे दिसून आले आहे.
मोटार वाहतूक कामगार अधिनियमाची पायमल्ली
वाकडेवाडी एसटी महामंडळाने विश्रांतिगृहे स्वच्छ ठेवण्यासाठी कोणतीही खासगी संस्था नेमून त्यांच्यामार्फत स्वच्छतेची व्यवस्था केली नसल्याचे या पाहणीत उघड झाले आहे. मोटार वाहतूक कामगार अधिनियम, १९६१ नुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांनुसार आणि विश्रांतीच्या वेळेनुसार त्यांना योग्य सुविधा मिळणे अपेक्षित आहे, ज्यामध्ये विश्रांतीची जागा अंतर्भूत केलेली आहे. त्यानुसार बसस्थानकाच्या परिसरात एसटी कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतिगृहे उपलब्ध असणे आणि त्यांची गुणवत्ता राखणे हे प्रशासनासाठी बंधनकारक असताना वाकडेवाडी बसस्थानकात त्या दिशेने काही पावले उचलली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
गाजर गवत आणि कचऱ्याचा विळखा
चालक-वाहकांची सोय व्हावी म्हणून वाकडेवाडी बसस्थानकात जिथून गाड्या बाहेर पडतात, त्याच्या डाव्या बाजूला टिनपत्र्याची छोटेखानी विश्रांतिगृहे थाटण्यात आली आहेत. मात्र तिथे चालक-वाहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे; कारण महामेट्रोकडून विश्रांतिगृहे थाटल्यानंतर एसटी विभागाने पुन्हा विशेष या विश्रांतिगृहांकडे जातीने लक्ष दिले नाही. मुळात या संपूर्ण विश्रांतिगृहांभोवती गुडघ्याइतक्या वाढलेल्या गवताचा आणि कचऱ्याचा विळखा पडला आहे.
चालक-वाहकांना करावी लागते जागेची शोधाशोध
आतील प्लायवूड अक्षरश: फुगून तुटली आहेत. त्यातच विश्रांतिगृहात स्वच्छतागृहातील ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी येत असल्याने चालक-वाहकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे विश्रांतिगृहाच्या मागे कचरा कुजत पडलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी कायम असते. या विश्रांतिगृहाच्या परिसरात बाहेरील खरकटे व उरलेले अन्न टाकले जाते. त्यामुळे येथे दुर्गंधीत भर पडते. यामुळे चालक-वाहकांना एसटीत किंवा अन्यत्र विश्रांतीसाठी जागेची शोधाशोध करावी लागत आहे.
मूलभूत सुविधा नाहीत; अपघातांचे मुख्य कारण
वाकडेवाडी आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतिगृहाची देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. गेल्या सहा वर्षांपासून गाद्या बदलण्यात आलेल्या नसल्याचा आरोप चालक-वाहकांनी केला आहे. परिणामी गाद्यांमधून दुर्गंधी येत आहे. विश्रांतिगृहात बेडशीट आणि उशी हा प्रकारच अस्तित्वात नाही. एसटी महामंडळाला एका सेवाभावी संस्थेकडून लेदरच्या गाद्यांसह ४५ बंग बेड मिळाले आहेत. पलंग मोडकळीस आलेले आहेत. त्यातच चालक-वाहकांची संख्या अधिक आणि व्यवस्था कमी असल्याने विश्रांतीची व्यवस्था होईलच, याची खात्री नाही. मुळात विश्रांतिगृहात ढेकूण, मच्छर, कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक आहे; मात्र विश्रांतिगृहाच्या स्थापनेपासून कधी पेस्ट कंट्रोल केल्याचे कुणीही सांगू शकत नाही. विश्रामगृहाचे छत अनेक ठिकाणी मोडकळीस आले आहे. अनेक पंखे बंद पडलेले आहेत.
स्वतःचेच अंथरूण-पांघरूण
बसस्थानकात राज्यभरातील इतर आगारांतून येणाऱ्या चालक-वाहकांना विश्रांतिगृहासाठी केवळ १०×१० चा एकच हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. या ठिकाणी मोजकेच पलंग टाकलेले आहेत. शिवाय गाद्याही नाहीत. चालक-वाहकांना स्वत:च अंथरूण-पांघरूण आणावे लागते. थेट जमिनीवर बेडशीट टाकून विश्रांती घ्यावी लागत आहे. बसस्थानकात चालक-वाहकांसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी नाही; पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागते, असे चालक-वाहकांचे म्हणणे आहे. पाणी मिळत नसल्याने पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते. विकत पाणी घेणे प्रत्येकाला परवडणारे नाही. याशिवाय हिवाळ्यात गरम पाणी मिळत नसल्याने थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे चालक-वाहकांचे म्हणणे आहे. किमान हिवाळ्यात तरी गरम पाण्याची सोय करावी, अशी चालक-वाहकांची मागणी आहे.
आगारप्रमुखांचे बेजबाबदार उत्तर
या संदर्भात प्रतिनिधीने वाकडेवाडी बसस्थानकाच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता, येथील बसस्थानकात पार्किंगसाठी जागा नसल्याने एसटी प्रशासनाच्या वतीने चालक-वाहकांना चिंचवड आगारात बस पार्किंग करून तेथील विश्रांतिगृहातच राहण्याच्या तोंडी सूचना केल्या आहेत. वाकडेवाडी बसस्थानकातील विश्रांतिगृहात राहणे त्यांना अलाउड नसल्याचे बेजबाबदार उत्तर दिले. यावर प्रतिनिधीने मोटार वाहतूक कामगार अधिनियम, १९६१ नुसार कर्मचाऱ्यांना बस ज्या ठिकाणी मुक्कामी असेल तेथेच विश्रांतीसाठी जागा असणे बंधनकारक असल्याचे सांगताच आगारप्रमुखांनी तुमचा मुद्दा बरोबर आहे, शिवाजीनगरात बसपोर्ट मंजूर झाले आहे, उद्घाटनदेखील झाले आहे, हक्काच्या जागेवर गेल्यानंतर नियमानुसार सगळ्या सुविधा देऊ, असे सांगितले.