पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:32 IST2026-04-09T12:32:06+5:302026-04-09T12:32:44+5:30
- तहसील कार्यालयांमध्ये प्रसिद्ध लवकरच निवडणुकीची रणधुमाळी, पुणे जिल्हा प्रशासन सज्ज

पुणे जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार
पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकींच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील ७५४ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तहसील पातळीवर जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत हरकती आणि सूचना देता येणार आहे. त्यानंतर नव्याने प्रारूप तयार करून ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
राज्यातील जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून हे काम प्रामुख्याने तीन टप्प्यांत होणार आहे. ग्रामसेवकांनी प्रत्यक्षात गावांमध्ये जाऊन नव्याने हद्दी तयार केल्या आहेत. त्यात जिल्ह्यात ७५४ ग्रामपंचायतींचे प्रारूप आराखडे तहसील पातळीवर तयार करण्यात आले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर देण्यात आला.
प्राप्त झालेल्या हरकतींवर २१ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार असून प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यावर, जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील. त्यानंतर ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आगामी काळात गावपातळीवरील निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. राजकीय इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील निवडणुका होऊ घातलेल्या ग्रामपंचायती
आंबेगाव २८, बारामती ५२, भोर ७३, दौंड ५७, हवेली (तहसील) २४, लोणी काळभोर तहसील २७, इंदापूर ६१, जुन्नर ६८, खेड ९१, मावळ ५७, मुळशी ४६, पुरंदर ६८, शिरूर ७१, वेल्हा ३१ अशा एकूण ७५४ ग्रामपंचायतींमध्ये नव्याने प्रारूप रचनेचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ७५४ ग्रामपंचायतींचा प्रारूप रचना मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. संबंधित तहसील कार्यालयात तो पाहता येईल. नवीन प्रारूप रचनेत अतिरिक्त ग्रामपंचायतींचा समावेश नसून नागरिकांना हरकती, सूचना असल्यास १३ एप्रिलपर्यंत तहसील पातळीवर मांडाव्यात. - जगदीश निंबाळकर, तहसीलदार, ग्रामपंचायत विभाग