माथाडी कायद्याच्या बदनामीविरोधात डॉ. बाबा आढाव मैदानात;आरोपांची चौकशी करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:38 IST2025-07-08T18:37:41+5:302025-07-08T18:38:01+5:30
कायदा संपवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप

माथाडी कायद्याच्या बदनामीविरोधात डॉ. बाबा आढाव मैदानात;आरोपांची चौकशी करा
पुणे : मुंबईत माथाडी कामगाराने ३०० कोटी रूपयांचा घोटाळा केला असे नुसते आरोप नकोत, त्या आरोपांची चौकशी करा, मात्र त्याचा आधार घेत माथाडी कायदा संपवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा असा इशारा राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, ९३ वर्षांचे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
हमालांसारख्या अंगमेहनती कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा देणारा, त्यांच्या नोकरीचे नियमन करणारा हा कायदा आहे. त्याच्या निर्मितीसाठी हमाल व अंगमेहनत करणाऱ्या कामगारांनी लढा दिला आहे. त्यांच्या त्यागातून हा कायदा निर्माण झाला. व्यापारी व हमाल यांच्यातील तंट्यांचा निपटारा करण्याची त्रि-सदस्यीय यंत्रणा माथाडी कायद्यात आहे. मात्र मागील काही वर्षात हा कायदाच संपवण्याचे पद्धतशीर षडयंत्र चालल्याची टीका डॉ. आढाव यांनी केली. राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे( छ. संभाजीनगर) , उपाध्यक्ष डॉ. हरीश धूरट( नागपूर), राजकुमार घायाळ( बीड), विकास मगदूम(सांगली), सह चिटणीस हनुमंत बहिरट ( पुणे) , अविनाश घुले ( अहिल्यानगर) , अप्पा खताळ (धुळे) , शिवाजी शिंदे (पंढरपूर) यांनी याबाबतचे सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले आहे.
माथाडी कायद्याचे अंमलबजावणीत कोणताही गैरप्रकार होता कामा नये अशीच महामंडळाची व महामंडळाशी संलग्न राज्यातील सर्व संघटनांची भूमिका राहिलेली आहे. कायद्याचा गैरवापर करत खंडणीखोरी करणाऱ्यांच्या विरोधात हमाल पंचायतीने रस्त्यावर मोर्चे काढले आहेत. कायद्याची कडक अमलबजावणी व्हावी म्हणून संघर्ष केला आहे. असे असताना मुंबईतील कोणा कामगाराने ३०० कोटी रूपयांची माया जमवली असे बोलले जात आहे. त्याची न्यायालयीन चौकशी करा, मात्र कायदा बदनाम करू नका अशी मागणी डॉ. आढाव यांनी केली आहे. हा कामगार कोण आहे? कोणत्या मंडळात त्याची नोंदणी होती? त्याला दरमहा किती पगार मिळत होता? राज्य माथाडी सल्लागार मंडळ या प्रश्नावर शांत का आहे? असे प्रश्न डॉ. आढाव यांनी उपस्थित केले आहेत.