भीमाशंकर साखर कारखान्यावर चुकीचे आरोप करू नये; बाळासाहेब बेंडेंचा रमेश येवलेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:38 IST2025-09-14T17:38:16+5:302025-09-14T17:38:58+5:30
काही दिवसांपूर्वी रमेश येवले यांनी पत्रकार परिषदेत भीमाशंकर कारखान्यावर काही गंभीर आरोप केले होते.

भीमाशंकर साखर कारखान्यावर चुकीचे आरोप करू नये; बाळासाहेब बेंडेंचा रमेश येवलेंना इशारा
अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेली महत्त्वाची संस्था असून, त्याचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आहे. स्वतःच्या सवंग लोकप्रियतेसाठी रमेश येवले यांनी कारखान्यावर खोटे आरोप करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिला. पारगाव दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी रमेश येवले यांनी पत्रकार परिषदेत भीमाशंकर कारखान्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्याचा खुलासा करताना बेंडे म्हणाले, “भीमाशंकर कारखाना शेतकऱ्यांच्या शेतीच्या अर्थकारणाचा आधार आहे. कारखान्याने पारदर्शक कारभाराद्वारे राज्य आणि देशपातळीवर २९ पारितोषिके मिळवून नावलौकिक कमावला आहे. येवले यांच्यासारखे लोक सवंग लोकप्रियतेसाठी खोटे आरोप करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.”
त्यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा खुलासा करताना सांगितले की, मागील वर्षीच्या ४२६ कोटी रुपये कर्जाच्या तुलनेत यंदा कर्ज ३६ कोटींनी वाढून ४६२ कोटी रुपये झाले आहे. याचे कारण गाळपात वाढ, डिस्टिलरी आणि सहवीजनिर्मिती प्रकल्पांसाठी घेतलेले कर्ज, तसेच साखर आणि मोलॅसिसचा शिल्लक साठा वाढणे आहे. “कर्जाची परतफेड नियमित सुरू आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. यंदा शेतकऱ्यांना २१० रुपये प्रति टन अंतिम हप्ता दिला, जो वाढाव्यातून वाटण्यात आला. त्यामुळे नफा कमी दिसत आहे,” असे बेंडे यांनी स्पष्ट केले.
येवले यांनी ५० किलोमीटरहून अधिक अंतरावरील ऊस आणि बिगरनोंदीच्या उसामुळे नुकसान आणि उतारा कमी झाल्याचा आरोप केला होता. याबाबत बेंडे म्हणाले, “मागील हंगामात एकूण गाळपापैकी फक्त ३.७२ टक्के ऊस ५० किलोमीटर बाहेरून आला आणि केवळ २ टक्के ऊस बिगरनोंदीचा होता. यंदा साखर उतारा ११.८१ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे आरोप खोटे ठरतात. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना भीमाशंकर कारखाना योग्य नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देत आहे. “ज्यांनी कधी सहकारी संस्था चालवली नाही, त्यांनी कारखान्यावर खोटे आरोप करू नये,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
फोटो : पारगाव (ता. आंबेगाव) येथील पत्रकार परिषदेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि संचालक.