पुणे - तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, तुमच्याकडून कुठलीही चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका असा कडक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या सूचक वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य तर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले.हे वक्तव्य त्यांनी नुकत्याच घडलेल्या वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात आता पाच जणांना अटक करण्यात आली असून, अलीकडेच मारूंजीचे माजी उपसरपंच हिरामण उर्फ काळू युवराज बुचडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाड यांना अटक झाली होती. सुरुवातीला पोलिसांकडून केवळ चार आरोपींची नावे सांगितली जात होती, मात्र सोशल मीडियावर या प्रकरणाची तीव्र चर्चा सुरू झाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढली आणि आणखी एकाची नोंद झाली.अजित पवारांच्या या इशाऱ्याने पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, कोणत्याही चुकीच्या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत भर दिला. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरही उपस्थित होते, त्यामुळे अजित पवारांचे हे वक्तव्य अधिकच लक्षवेधी ठरले. वाखारी गोळीबार प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकारण आणि गुन्हेगारी यातील संभाव्य संबंधांवर चर्चा झडू लागली आहे.ती दुसरी फॉर्च्युनर कोणाचीन्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणाची माहिती अद्यापही स्पष्टपणे समोर आली नाही. रोज नवीन माहिती समोर येत आहे. भांडाभोड झाल्यानंतर पोलिसांनी बुचडेला ताब्यात घेतले. त्यानंतर या संशयितांनी वापरलेले वाहनदेखील जप्त केले. मात्र, त्या ठिकाणी अजून एक फॉर्च्युनर असल्याची चर्चा सुरु आहे. ती काेणाची आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असेल की नाही याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे. कारण आधीच एका संशयीताला अभय तसेच कला केद्राला अभय देण्यचा प्रयत्न सुरु आहे. त्यात आता ही नवी फॉर्च्युनर यामुळे संपूर्ण तपासच चक्रावणारा ठरत आहे.
कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:34 IST