पुणे : वाढत्या प्रवासी संख्येला प्रतिसाद देत पुणेविमानतळाने उन्हाळी वेळापत्रक २०२६ लागू करत हवाई सेवा वाढविली आहे. नव्या वेळापत्रकामुळे देशांतर्गत उड्डाणांची व्याप्ती वाढणार असून, मे महिन्यापासून स्लॉट वाढीमुळे नवीन मार्ग आणि अतिरिक्त उड्डाणांची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढली नसल्याने स्थिती जैसे थे आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांच्या निर्देशानुसार उन्हाळी वेळापत्रक लागू झाले आहे. यामध्ये १ मेपासून १५ अतिरिक्त स्लॉट वाढविण्याचे नियोजन असून, एकूण स्लॉट संख्या २३५ वर जाणार आहे. सध्या २१६ स्लॉट वापरात असून, उर्वरित स्लॉट विमान कंपन्यांना त्यांच्या उपलब्धता आणि नेटवर्कनुसार वाटप केले जाणार आहेत. या वाढीव क्षमतेचा फायदा घेत काही नवीन मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये एअर इंडियाकडून बागडोगरा, स्टार एअरकडून सोलापूर - तिरुपती आणि फ्लाय ९१कडून मंगळुरू या मार्गांचा समावेश आहे. तसेच सुरू असलेल्या मार्गांवरही उड्डाणांची वारंवारता वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्पाइसजेटकडून कोलकाता, अकासा एअरकडून वाराणसी आणि एअर इंडिया एक्सप्रेसकडून बंगळुरू मार्गांवर अतिरिक्त उड्डाणे अपेक्षित आहेत. देशांतर्गत सेवांमध्ये पुणे विमानतळ आता देशातील तब्बल ३७ शहरांशी जोडले गेले आहे. दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि जयपूर या प्रमुख शहरांसाठी सर्वाधिक उड्डाणे सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय उड्डाणाला ‘खो’
पुण्यातून दररोज २०० उड्डाणे आणि ३३ ते ३४ हजार प्रवाशांची वर्दळ असतानाही आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झालेली नाही. उलट गेल्यावर्षी सुरू असलेल्या सहा आंतरराष्ट्रीय विमानसेवांपैकी तीन उड्डाणे बंद झाल्याने सध्या फक्त बँकॉक, दुबई आणि अबुधाबी अशी तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. त्यात युद्धामुळे दुबई आणि अबुधाबी सेवा सध्या अनिश्चित वेळी सुरू आहे. गेल्या उन्हाळी हंगामात दुबई आणि बँकॉकसाठी प्रत्येकी दोन, तर सिंगापूर आणि अबुधाबीसाठी प्रत्येकी एक विमानसेवा उपलब्ध होती. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि व्यावसायिक कारणांमुळे दुबई व अबुधाबी सेवा बंद पडल्या, तर सिंगापूरची सेवा आधीच थांबविण्यात आली आहे.
पुणे विमानतळाचे उन्हाळी वेळापत्रक २०२६मध्ये देशांतर्गत उड्डाणांची संख्या, वारंवारता आणि शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे नियोजन स्वागतार्ह आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने स्थिती अद्याप जैसे थे आहे. जागतिक स्तरावर वाढती प्रवासी मागणी, उद्योग-व्यवसायातील जागतिकीकरण आणि परदेशी गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख आंतरराष्ट्रीय हब्सशी थेट जोडणी वाढविण्याची मोठी गरज आहे. विशेषत: सिंगापूर व दोहा यांसारख्या जागतिक ट्रान्झिट हब असलेली शहर पुण्यातून थेट उड्डाणाने जोडल्यास प्रवाशांना अधिक पर्याय मिळतील. - धैर्यशील वंडेकर, वाहतूक तज्ज्ञ
Web Summary : Pune airport boosts domestic flights with new routes and increased frequency due to growing passenger numbers. International flights remain limited, with only Bangkok, Dubai, and Abu Dhabi currently served.
Web Summary : पुणे हवाई अड्डा यात्री संख्या बढ़ने से घरेलू उड़ानों को नए मार्गों और बढ़ी हुई आवृत्ति के साथ बढ़ावा देता है। अंतर्राष्ट्रीय उड़ानें सीमित हैं, वर्तमान में केवल बैंकॉक, दुबई और अबू धाबी के लिए।