उजनी धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग निम्म्याने कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:37 IST2025-09-16T19:36:27+5:302025-09-16T19:37:51+5:30
- पुणे शहरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी येत असल्याने उजनी धरण आधीच शंभर टक्क्याहून अधिक भरले होते

उजनी धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग निम्म्याने कमी
इंदापूर : सोमवारच्या तुलनेत दौंडहून येणा-या विसर्गात घट झाल्याच्या तुलनेत धरणातून नदीत सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण ही निम्म्याने कमी करण्यात आले आहे. मंगळवारी ( दि.१६) सायंकाळी उजनी धरणाच्या सांडव्यातून ५५ हजार क्युसेक्स क्षमतेने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. तरी ही नदी काठांवरील गावे व ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचा प्रशासनाचा इशारा कायम आहे.
पुणे शहरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी येत असल्याने उजनी धरण आधीच शंभर टक्क्याहून अधिक भरले होते. रविवारच्या पावसाने कहर केल्यानंतर धोकादायक पातळीच्या वर पाणी जावून अघटित घटना घडू नये म्हणून सोमवारी सकाळपासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणा-या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत १ लाख क्यूसेक क्षमतेने नदीत पाणी सोडण्यात आले.
मंगळवारी दौंडकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ११ हजार ५७७ ने घट झाली. २२ हजार ४२३ क्युसेक्सने धरणात पाणी येत असल्याने सायंकाळी सहा वाजता एक लाख क्यूसेक ऐवजी ५५ हजार क्युसेक्सने सांडव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सांडव्याबरोबरच पॉवर हाऊससाठी १ हजार ६०० क्युसेक्स,सिना माढा उपसा सिंचन योजनेसाठी १८० क्युसेक्स,बोगद्यातून २०० क्युसेक्स व मुख्य कालव्याद्वारे 600 क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडून उजनी धरण धोक्याच्या पातळीबाहेर ठेवण्याचे काम उजनी धरण व्यवस्थापन समिती करत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्रात जावू नये. सखल भागातील जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे.