प्रत्येक प्री स्कूलमध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम; साखळी प्री स्कूलमध्ये पाच हजारांची पुस्तके पालकांच्या माथी
By दीपक होमकर | Updated: December 4, 2025 15:32 IST2025-12-04T15:31:42+5:302025-12-04T15:32:10+5:30
काही स्कूल मात्र फक्त अक्षरांची ओळख करून देणे इथपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करतात.

प्रत्येक प्री स्कूलमध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम; साखळी प्री स्कूलमध्ये पाच हजारांची पुस्तके पालकांच्या माथी
पुणे : प्री स्कूलचा अभ्यासक्रम (सिलॅबस) काय असावा, याबाबत शासनाकडून काहीच निर्देश नाहीत, त्यामुळे प्रत्येक प्री स्कूलने स्वत:चा वेगवेगळा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यामुळे काही प्री स्कूलच्या नर्सरीमध्ये एलकेजीमध्येच ए ते झेडपर्यंतची अक्षरे लिहिण्याचा सराव करून घेतला जातो तर काही स्कूलमध्ये चक्क दहापर्यंतचे पाढे (टेबल्स) पाठ करण्यावर भर दिला जातो. तर काही स्कूल मात्र फक्त अक्षरांची ओळख करून देणे इथपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करतात. त्यामुळे प्री स्कूलमध्ये मुलांवर अभ्यासाचा किती ताण दिला जावा, यावरही शासनाचे, शिक्षण विभागाचे काहीच नियंत्रण नाही, हे स्पष्ट आहे.
नर्सरीत शिकणाऱ्या मुलाचे वय तीन वर्षे तर एलकेजीमधील मुलांचे वय चार वर्षे असते. या वयात मुलांच्या हातात पेन्सील देऊन त्यांना अक्षर लिहिण्याचा तासन् तास सराव करून घेणे हे त्यांच्या बोटांसाठी धोकादायक असल्याचा इशारा डॉक्टर देतात. मुलांनी पेन्सील चुकीच्या पद्धतीने धरून खूप वेळ लिहायचा सराव केल्यास त्यांच्या बोटांचे हाड वाकडे होऊन बोट वाकडे होण्याची शक्यताही डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत प्री स्कूलकडून स्वत:च्या गवगवा करण्यासाठी मुलांना लिखाणासाठी जुंपले जात आहे.
सध्या प्री स्कूलचे पेव फुटले असल्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी प्रकाशन संस्थांनीच पुढाकार घेतला आहे. अनेक प्रकाशन संस्थांनी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी या इयत्तांसाठी तब्बल पाच ते सात पुस्तके तयार केली आहेत. ती पुस्तके शाळांनी घ्यावीत, यासाठी या प्रकाशन संस्थांकडून शाळेला विविध आमिषेसुद्धा दिली जातात. त्यांची पुस्तके अभ्यासक्रमासाठी वापरली तर संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासाठी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू सारख्या ठिकाणी नेऊन त्यांना पुरस्कार दिले जाण्याचे प्रकारही बड्या प्रकाशन संस्थांकडून केले जात आहे.
मूल पाच वर्षांचे अन् पुस्तके आठ, किंमत पाच हजार
एका बड्या प्रकाशन संस्थेकडून शाळांना प्ले ग्रुप ते युकेजीपर्यंत पुस्तक आणि शैक्षणिक साहित्यांचे पॅकेज दिले जाते. त्यामध्ये तब्बल आठ पुस्तके आणि पाच विविध साहित्य आहेत. त्यामध्ये टेक्स्ट बुक, नोटबुक, स्टुडंट मेमरी, बुक, स्टुडंट डायरी, स्कूल बॅग, स्टुडंड आयकार्ड विथ इनयार्ड, पॅरेंट इक्सॉर्ट कार्ड, १० इन्व्हेन्शन कार्ड फॉर वेरिअस इव्हेंट, स्टुडंट अन्युअल रिपोर्ट कार्ड, स्पोर्ट्स डे मेडल्स ॲण्ड सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट, टेकअवे आर्ट अँड क्राफ्ट किट, फ्लॅश कार्ड पोर्टफोलिओ बुक, अशी किट दिली जाते. त्याची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. प्री स्कूलने हे पॅकेज घेतले तर त्याचा खर्च वसूल करण्यासाठी पालकांकडून ते फीमधून वसूल केले जाते.