Video : शरद पवारांमुळे रोहित टिळकांची राज्यसभा हुकली? स्वतः रोहित टिळकांनी दिलं स्पष्टीकरण
By किरण शिंदे | Updated: March 12, 2026 17:01 IST2026-03-12T16:57:55+5:302026-03-12T17:01:23+5:30
रोहित टिळक म्हणाले, राज्यसभेसाठी मी जाणार होतो. स्वतः एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाची घोषणा केली होती.

Video : शरद पवारांमुळे रोहित टिळकांची राज्यसभा हुकली? स्वतः रोहित टिळकांनी दिलं स्पष्टीकरण
पुणे - पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला वेग आला असतानाच त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज भरणार होतो, मात्र महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव पुढे आल्यानंतर आपला अर्ज थांबवण्यात आल्याचं रोहित टिळक यांनी स्पष्ट केलं.
रोहित टिळक म्हणाले, राज्यसभेसाठी मी जाणार होतो. स्वतः एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याचंही जवळपास ठरलं होतं. मात्र महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव समोर आल्यानंतर परिस्थिती बदलली. टिळक पुढे म्हणाले, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत. त्यांच्या कामाचं आणि योगदानाचं महत्त्व खूप मोठं आहे. तसेच पवार कुटुंब आणि टिळक घराण्याचे वैयक्तिक संबंधही अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं योग्य ठरणार नाही, असं वाटल्याने उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेवर नाराज असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं. त्यानंतर पक्षात आपल्याविरोधात नाराजी वाढल्याचा दावाही त्यांनी केला.या पार्श्वभूमीवर रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.