‘देवदूत’ची फाइल आणि कागदपत्रेही सापडेना; ११ कोटी ४२ लाख खर्चून घेतलेल्या गाड्यांचा वापर नगण्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:49 IST2025-03-29T14:49:12+5:302025-03-29T14:49:33+5:30

तीनही विभाग संबंधित फाइल आमच्याकडे नाही, असे म्हणत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

pune news : Devdoot' file and documents not found; Vehicles purchased at a cost of Rs 11.42 crore are not being used | ‘देवदूत’ची फाइल आणि कागदपत्रेही सापडेना; ११ कोटी ४२ लाख खर्चून घेतलेल्या गाड्यांचा वापर नगण्य

‘देवदूत’ची फाइल आणि कागदपत्रेही सापडेना; ११ कोटी ४२ लाख खर्चून घेतलेल्या गाड्यांचा वापर नगण्य

- हिरा सरवदे 

पुणे :
आपत्तीच्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने २०१६ मध्ये ११ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून घेतलेल्या आणि त्यावेळी वादग्रस्त ठरलेल्या देवदूत गाड्यांचा वापर नगण्य असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरसचिव कार्यालय आणि अग्निशामक विभाग या तीनही विभागाकडे देवदूत संदर्भातील कागदपत्रे किंवा फाइल काहीच पाहायला मिळत नाहीत. तीनही विभाग संबंधित फाइल आमच्याकडे नाही, असे म्हणत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

आग, पूर, झाडपडी, भिंतपडी, इमारत कोसळणे, इमारतीमध्ये किंवा लिफ्टमध्ये कोणी अडकले असेल तर त्याला बाहेर काढणे, अशा विविध आपत्ती किंवा संकटाच्या काळात नागरिकांसह प्राणी, पक्ष्यांच्या मदतीसाठी महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे. अग्निशामक विभागाचे मुख्यालय भवानी पेठ येथे असून, शहरात विविध २० ठिकाणी अग्निशामक केंद्र आहेत. तर महापालिका भवनच्या चौथ्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचा नियंत्रण कक्ष आहे. आपत्तीच्या वेळी मदतीसाठी किंवा नागरी समस्यांसाठी कक्षात फोन आल्यानंतर ती घटना अग्निशामक विभागास किंवा संबंधित विभागास कळविली जाते. आपत्ती व्यवस्थापनाकडे कॉल सेंटर सोडून आपत्तीच्या वेळी मदत करण्याची स्वत:ची अशी कोणतीही यंत्रणा नाही.

दरम्यान, आपत्तीच्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने २०१६-१७ मध्ये ११ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून ६ देवदूत वाहने खरेदी केली होती. एका देवदूत गाडीची किंमत १ कोटी ९० लाख रुपये असल्याचे ही खरेदी वादात सापडली होती. 'देवदूत'च्या वाहनांना 'मर्सिडीज बेंझ'चे इंजिन असल्याने या वाहनांची मूळ किंमत म्हणून एक कोटी ८४ लाख रुपये दिल्याचे स्पष्टीकरण आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी त्यावेळी तत्कालीन महापौर व आयुक्त यांच्यासमोर दिले होते. त्यावर तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 'देवदूत' योजनेची चौकशी करून तिची उपयुक्तता, त्यावरील खर्च पाहून अंमलबजावणीचा विचार करू. तसेच योजना आणि खर्चात त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र पुढे काहीच झाले नाही.

त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने दोन वर्षे देवदूतची सहा वाहने स्वत:कडे ठेवून नंतर ती अग्निशामक विभागाकडे हस्तांतरित केली. शहरातील विविध प्रकारच्या आपत्तीवेळी देवदूत वाहनांचा किती प्रमाणात वापर झाला, याचा कसलाही डेटा आपत्ती व्यवस्थापनाकडे आणि अग्निशामक दलाकडेही नाही. याशिया देवदूत संदर्भातील फाइल किंवा इतर कागदपत्रे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरसचिव कार्यालय आणि अग्निशामक विभाग या तीनही विभागाकडे सापडत नाही. त्यामुळे देवदूत गाड्यासंदर्भातील माहिती प्रशासन का लपवत आहे, यात काय गौडबंगाल आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
अधिकारी काय म्हणाले...

- देवदूतसंदर्भात नगरविकास विभागाकडे चौकशी केल्यानंतर संबंधित डॉकेट आपत्ती व्यवस्थापन विभागाचे होते, त्यांच्याकडे माहिती मिळेल, असे सांगण्यात आले.
- आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला माहिती देतो असे सांगितले. मात्र, प्रश्न अडचणीचे असल्याचे लक्षात येताच अग्निशामक विभागाकडे बोट दाखले. 'देवदूत'च्या वाहनांना 'मर्सिडीज बेंझ'चे इंजिन आहे की नाही हे तपासले का, या प्रश्नावर मात्र, सोनुने यांनी उत्तर देणे टाळले.
- अग्निशामक विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफाडे यांनी सुरुवातीला फोन घेतला. देवदूतचा आताही वापर होतो, एवढेत सांगितले, नंतर फोनच घेतले नाहीत.
 

देवदूतचा वापरच नाही...

अग्निशामक दलात सामील झालेल्या देवदूत गाड्यांचा वापर ठेकेदाराची लोक असेपर्यंतच कमी अधिक प्रमाणात होत होता. त्यानंतर या गाड्यांचा वापर बंद आहे. गाड्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयात तीन-चार वर्षांपासून उभ्या आहेत. त्याचा वापर होत नसल्याने त्याही काही साधने खराब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अग्निशामक दलातीलच सूत्रांनी दिली होती. मात्र, याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख वापर सुरू असल्याचे सांगतात. दुसरीकडे त्यांचा विभाग देवदूतचा वापर किती व कसा होतो, याची माहिती देत नाही.

Web Title: pune news : Devdoot' file and documents not found; Vehicles purchased at a cost of Rs 11.42 crore are not being used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.