'येळकोट येळकोट जय मल्हार' ..! जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 18:57 IST2025-12-14T18:56:46+5:302025-12-14T18:57:05+5:30
राज्याच्या विविध प्रांतातून आलेल्या भाविकांनी जेजुरी शहरात शनिवार(दि.१३)पासूनच मोठी गर्दी केली होती.

'येळकोट येळकोट जय मल्हार' ..! जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जेजुरी : येथील कुलदैवत खंडेरायाच्या गडावर देवदर्शनासाठी शनिवारी व रविवारी एक लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोष आणि भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.
राज्याच्या विविध प्रांतातून आलेल्या भाविकांनी जेजुरी शहरात शनिवार(दि.१३)पासूनच मोठी गर्दी केली होती. लॉज, भक्तनिवास आणि पुजारी वर्गाच्या निवासस्थाने येथे मोठ्या संख्येने भाविकांनी निवास केला होता. रविवारी पहाटेपासूनच खंडोबा, म्हाळसादेवी आणि बाणाईदेवी यांच्या दर्शनासाठी लक्षणीय गर्दी झाल्यामुळे देवसंस्थान प्रशासनावर व्यवस्थेच्या दृष्टीने मोठा ताण पडला होता.
सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी देवदर्शन घेतल्याचे सेवक वर्गाने सांगितले. सध्याच्या लग्नसराईच्या दिवसा आणि सहलींच्या हंगामामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत भाविकांची गर्दी सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.