Pune News : बिल्डरांवर ईडीची धाड टाकल्याच्या खोट्या वृत्ताला कोर्टाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:13 IST2025-09-26T11:12:27+5:302025-09-26T11:13:07+5:30
कोर्टाच्या या निर्णयामुळे खोट्या व बदनामीकारक वृत्तांना चाप बसला असून, माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि तथ्य पडताळून पत्रकारिता करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Pune News : बिल्डरांवर ईडीची धाड टाकल्याच्या खोट्या वृत्ताला कोर्टाने फटकारले
पुणे :पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद रांका यांच्यासह काहींवर सक्तवसुली संचालनालय (ED) ने धाड टाकल्याची बातमी 'पुणे टाइम्स मिरर'ने दिली होती. मात्र, ही माहिती पूर्णतः खोटी, दिशाभूल करणारी आणि वस्तुनिष्ठतेपासून दूर असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
सॉलिटेअर ग्रुपचे प्रमोद रांका यांच्यासह अन्य प्रतिष्ठित व्यावसायिकांची या वृत्तामुळे बदनामी झाली होती. त्यामुळे प्रमोद रांका यांनी दाखल केलेल्या विशेष दिवाणी खटला क्र. १७६४/२०२५ मध्ये न्यायालयाने संबंधित खोट्या बातम्या तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट निरीक्षण नोंदवले असून, आदेशात म्हटले आहे की, 'पुणे टाइम्स मिरर'च्या 'यू-ट्यूब, फेसबुक, डिजिटल आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला चुकीचा मजकूर त्वरित हटवण्यात यावा. त्यांनी दिलेले वृत्त खरे नसून, वस्तुनिष्ठ देखील नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ चुकीचा मजकूर हटवावा.
कोर्टाच्या या निर्णयामुळे खोट्या व बदनामीकारक वृत्तांना चाप बसला असून, माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि तथ्य पडताळून पत्रकारिता करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.या निर्णयामुळे रांका यांच्यावर लावलेले निराधार आरोप फेटाळले गेले आहेत.