साठीनंतरही जोडप्याचा घटस्फोटासाठी दावा;पत्नीची अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 20:23 IST2025-12-02T20:22:47+5:302025-12-02T20:23:40+5:30
लग्नाच्या ३७ वर्षांनंतर जोडप्यामधील वाद विकोपाला

साठीनंतरही जोडप्याचा घटस्फोटासाठी दावा;पत्नीची अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली
पुणे :नोकरीतील निवृत्तीनंतर खरंतर एकमेकांबरोबर सुखी आयुष्य घालवायचं. एकमेकांची अपूर्ण राहिलेली स्वप्नं पूर्ण करायची. मात्र, ‘वय साठी अन् बुद्धी नाठी’ या उक्तीप्रमाणे एका जोडप्याने वयाची साठी उलटल्यानंतर घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढली असून, या दाव्यात पत्नीने केलेली अंतरिम पोटगीची मागणी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश गोविंद वायाळ यांनी फेटाळली आहे. त्यामुळे पतीला दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात पतीच्या वतीने ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. अनिकेत डांगे यांनी बाजू मांडली. राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. त्यांना ३५ वर्षांचा मुलगा आहे. त्याचे लग्न झाले असून, तो विभक्त राहत आहे. पती सरकारी नोकरीत तर पत्नी केंद्र सरकार पुरस्कृत संशोधन संस्थेमध्ये नोकरीला होती. दोघेही पीएच.डी.धारक दाम्पत्य. मात्र, दोघांमधील वाद तब्बल ३७ वर्षांनी इतका विकोपाला गेला की दोघेही घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढले.
निवृत्तीच्या वयानंतर दोघांचे पटेनासे झाले. त्यामुळॆ दोघांनी एकमेकांविरोधात घटस्फोटासाठी दावा दाखल केला. यामध्ये पत्नीने ५० हजार रुपये अंतरिम पोटगीची मागणी केली. यास पतीच्या वकिलांनी विरोध केला. दोघांनी आयुष्यभर चांगली कमाई केली आहे. तिला जवळपास ४ हजार रुपये पेन्शन आहे. तिच्या नावावर असलेल्या मुदत ठेवीतून जवळपास ३० हजार रुपये व्याज मिळत आहे. त्यामुळे तिने केलेली अंतरिम पोटगीची मागणी फेटाळण्याची मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अंतरिम पोटगीची मागणी फेटाळली.