पुणे : दिवसेंदिवस सहकारी चळवळीला सुरुंग लागत आहे. खाजगी कारखान्यांचे प्रस्थ वाढत असून, ते पाहून अस्वस्थता वाढत आहे. कारखान्यांबाबत समस्या निर्माण झाल्यास चर्चा कुणाशी करावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील खासगी कारखाने राज्याबाहेरील लोकांचे असल्याने त्यांना स्थानिकांशी आस्था नाही. त्यातच या कारखान्यांची गाळपक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कमी क्षमतेचे सहकारी कारखाने टिकणे अवघड झाले आहे. या खासगी कारखान्यांनी कामगारांची संख्यादेखील कमी केल्याने सहकार्य कारखाने त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने गाळप क्षमतेबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघ, राज्य सरकार यांच्यात चर्चा घडवून याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, किशोर पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, प्रतिष्ठानच्या सचिव वंदना पवार, अंकुश काकडे उपस्थित होते. पवार म्हणाले, उत्तर प्रदेशात खासगी साखर कारखाने वाढत असून, तीच स्थिती आता महाराष्ट्रातही दिसत आहे. सहकारी कारखाने दिवसेंदिवस कमी होत आहेत. खासगी कारखान्यांमध्ये कमीतकमी कामगारांमध्ये काम करण्याची प्रथा सुरू झाली आहे. कारखाने टिकले पाहिजेत, मात्र, घाम गाळणाऱ्या कारखान्यात कामगारांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे काय, याचा विचार करावा लागेल. कारखान्याच्या गाळप क्षमतेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे कमी क्षमता असलेले सहकारी कारखाने पुढील टिकणार नाही. त्यासाठी राज्य सरकारने गाळप क्षमतेबाबत धोरण आखले पाहिजे.किशोर पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत पूर्वी साखर कामगार संघटना चर्चेसाठी आल्यानंतर कामगारांच्या पदरात जास्तीतजास्त पाडून घेण्याची त्यांची भूमिका असायची. मात्र, बैठकीनंतर कारखानदार संघटनेचे नेते यांच्यात सख्य असायचे. त्यांनी कायमच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला. सध्या मात्र, कामगारांची मानसिकता ‘संघर्ष नको’ अशी झाली आहे. यावर देखील विचार करण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.पूर्वी बहुतांश तरुण डाव्या विचारांचे असायचे. सध्या मात्र तरुणांच्या विचारांना शहकाटशहा दिला जात आहे त्यांच्यात धार्मिक ओढ जास्त दिसून येत असून, लोकशाहीचा विचार पुढे नेण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. आपण यात कमी पडत आहोत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ठाकूर यांनी किशोर पवार हे सीमा लढ्याचे शेवटचे आधार होते, असे सांगितले.
साखर कारखानदारी संकटात ? शरद पवारांचा इशारा म्हणाले,'गाळप क्षमतेवर नवे धोरण हवेच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:44 IST