‘कंत्राटीं’ना मिळणार सामाजिक सुरक्षा कवच;मागील थकबाकी आणि तपासणीशिवाय ईएसआय नोंदणीची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:14 IST2025-08-30T15:14:18+5:302025-08-30T15:14:40+5:30
- कंपन्या-कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन आणि नोंदणीसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून ‘स्प्री २०२५’ योजना

‘कंत्राटीं’ना मिळणार सामाजिक सुरक्षा कवच;मागील थकबाकी आणि तपासणीशिवाय ईएसआय नोंदणीची संधी
पिंपरी : नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांना आणि कंत्राटी व तात्पुरत्या कामगारांना आता कोणत्याही तपासणीशिवाय आणि मागील थकबाकीशिवाय कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजनेत नोंदणीची संधी दिली जाणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कंपन्या आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्प्री २०२५’ (स्कीम फाॅर प्रमोशन ॲड रजिस्ट्रेशन ऑफ एम्पलाॅईज) ही विशेष योजना सुरू केली आहे. याअंतर्गत कंत्राटी कामगारांना हे सामाजिक सुरक्षा कवच मिळणार आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे.
कामगारांची नोंदणी ईएसआयसी पोर्टल, श्रम सुविधा पोर्टल आणि एमसीएस या पोर्टलवर करता येईल. स्वयंप्रेरित अनुपालनाला चालना देणे आणि असंघटित व कंत्राटी क्षेत्रातील लाखो कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. पूर्वी नोंदणी न केल्यास दंडात्मक कारवाई व मागील थकबाकीची वसुली केली जात होती. मात्र, या योजनेत ते सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत.
नोंदणीनंतर कर्मचाऱ्यांना ईएसआयसीच्यावतीने मोफत वैद्यकीय सेवा, अपघात, आजार व मातृत्व लाभ, बेरोजगारी किंवा अपंगत्वासाठी मदत तसेच कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य मिळणार आहे.
अडथळे संपले, सुविधा वाढल्या
कंपन्यांना नोंदणीसाठी बिलांची असणारी भीती आणि तपासणीची चिंता संपली आहे. आता नोंदणी करताना जुनी थकबाकी भरण्याची गरज नाही. कागदपत्रांची कटकट कमी झाली आहे. नोंदणीही ऑनलाइन व सोपी झाली आहे. अनियमित कामगारांनाही आरोग्यसेवा आणि पेन्शनसारखे सामाजिक सुरक्षा फायदे मिळणार आहेत.
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे. दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्या, दुकाने, हाॅटेल अन्य विविध आस्थापनांमधील कामगारांसाठी दंड व मागील थकबाकीशिवाय नोंदणीसाठी ही सुवर्णसंधी आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ईएसआयसी पोर्टल, श्रम सुविधा पोर्टल आणि एमसीएस या पोर्टलवर नोंदणी करावी. - योगेश जाधव, प्रभारी शाखा व्यवस्थापक, ईएसआयसी कार्यालय चिंचवड.