जुन्या कच-यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा - नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:29 IST2025-11-02T17:17:06+5:302025-11-02T17:29:02+5:30
उरूळी देवाची कचरा डेपोला पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली भेट; पालिका कचरा प्रक्रिया क्षमता वाढविणार

जुन्या कच-यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा - नवल किशोर राम
पुणे :पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व शाश्वत करण्यासाठी अजून नवे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात महापालिकेची कचरा प्रक्रिया क्षमता वाढविण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. लिगसी वेस्ट (जुना कचरा) यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग किंवा बायो-रिमेडियेशन प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
उरुळी देवाची कचरा डेपोला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज भेट देउन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख संदिप कदम, कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप , अमर मदिकुंट आदी उपस्थित होते. पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्प, ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.
हडपसर आणि घोले रोड येथील कचरा हस्तांतरण केंद्र यांचे आधुनिकीकरण करणे, घरोघरी जाऊन वाहनांद्वारे कचरा गोळा करणे कामी आधुनिक यंत्रणा निर्माण करणे, स्मार्ट कलेक्शन केंद्र निर्माण करणे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे कामकाज गतीने पूर्ण करणे बाबतचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. पुणे महापालिका पर्यावरणीय दृष्टीने शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ आणि हरित पुण्याच्या दिशेने पुढील पाऊले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
लोकोपयोगी प्रकल्पासाठी ती जागा वापरणार
लिगसी वेस्ट (जुना कचरा) यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग किंवा बायो-रिमेडियेशन प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करावी. रिकामी करण्यात आलेली जागा लोकोपयोगी प्रकल्प अथवा विकास योजनांसाठी वापरणे शक्य होईल असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.