शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:32 IST2025-05-31T14:30:41+5:302025-05-31T14:32:43+5:30
या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार
पुणे - शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील शिवसृष्टी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गेटवर लघुशंका केल्याच्या प्रकरणी एक दाम्पत्य अडचणीत आले आहे. या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
तक्रार दाखल करणारे नयनाथ तुकाराम अमराळे (वय 23) हे शिक्षण घेत असून, त्यांनी सांगितल्यानुसार, शनिवारी पहाटे सुमारास ते आणि त्यांचे रूममेट अभिजीत सितापुरे हे नवले ब्रिजवरून घरी परतत होते. यादरम्यान, शिवसृष्टीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन चारचाकी गाड्या उभ्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यापैकी एका गाडीजवळ एक पुरुष व्यक्ती सूचना फलकाजवळ लघुशंका करताना दिसला, तर त्यांच्यासोबत एक महिला उभी होती.
ही घटना रेकॉर्ड केल्याचे अक्षय गायकवाड या स्थानिक तरुणाने सांगितले. त्यानंतर अमराळे आणि त्यांच्या मित्राने संबंधित व्यक्तींना विचारणा केली असता, त्या पुरुषाने स्वतःचे नाव अमोल अरुण कुलकर्णी (वय 59, धायरी, पुणे) व त्यांच्या सोबत असलेल्या महिलेचे नाव पत्नी स्नेहा अमोल कुलकर्णी (वय 57) असल्याचे सांगितले.
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. घटनास्थळाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणले. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.