खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रस्थापितांसमोर नवख्यांचे आव्हान ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:29 IST2025-10-28T17:28:21+5:302025-10-28T17:29:36+5:30
विशेष म्हणजे तालुक्याच्या या निवडणुकीत दोन माजी व दोन आजी आमदार विशेष लक्ष ठेवून आहेत.

खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रस्थापितांसमोर नवख्यांचे आव्हान ?
- भानुदास पऱ्हाड
आळंदी : खेड तालुक्याचे वातावरण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे पुन्हा एकदा तापून निघणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर परिस्थिती बदलत चालली आहे. कारण, अपेक्षित आरक्षण न निघाल्याने अनेक पुरुष इच्छुक उमेदवारांची निराशा झाली आहे. मात्र, यावर पर्याय काढत बहुतांश जणांनी आपल्या सौभाग्यवतीचे नशीब अजमवण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये तरुण उमेदवार पुढे येऊ लागल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांसमोर नवख्यांचे आव्हान? असे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या या निवडणुकीत दोन माजी व दोन आजी आमदार विशेष लक्ष ठेवून आहेत.
खेड तालुक्याच्या राजकारणात ग्रामपंचायत, सहकारी संस्था आणि बाजार समितीप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. पारंपरिकरित्या एका विशिष्ट राजकीय गटाच्या किंवा एखाद दुसऱ्या प्रमुख पक्षाच्या प्रभावाखाली असलेल्या तालुक्याच्या राजकारणावर प्रस्थापित नेत्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. परिणामी अशांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर वर्चस्व ठेवले आहे. मात्र, अलीकडच्या काळात युवा पिढी राजकारणात सक्रिय झाल्याने चित्र बदलली जात आहेत.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रस्थापित गट आणि उद्योन्मुख नेते किंवा विरोधक यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे. प्रस्थापित नेत्यांना त्यांचे पारंपरिक मतदार आणि विकासकामांचे पाठबळ आहे. तर नवखे उमेदवार रखडलेले रस्ते, प्रचंड होणारी वाहतूककोंडी, स्थानिक बेरोजगारी व पायाभूत सुविधांची कमतरता या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. या निवडणुकीत युवा मतदार आणि शहरीकरण झालेल्या भागातील मतदारांचा कल निर्णायक ठरू शकतो. तालुक्यात प्रामुख्याने प्रमुख राजकीय पक्षांमध्ये छुपी गटबाजी दिसून येत आहे. या निवडणुकीतही पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही जागांवर बंडखोरी किंवा अधिकृत उमेदवारांना अडचणी येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी आणि भाजप - शिंदेसेना युतीची समीकरणे स्थानिक पातळीवर कशी जुळतात यावरही बऱ्याच जागांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यातच वाढती लोकसंख्या, कामगार वर्ग निवडणुकीचा निकाल बदलू शकतात. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून अंतिम क्षणापर्यंत उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान प्रचारादरम्यान सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि व्यक्तिगत गाठीभेटीवर तरुण इच्छुक उमेदवार अधिक भर देत आहेत. पक्षाचे चिन्ह, व्यक्तिगत संबंध आणि उमेदवाराची स्थानिक ताकद निवडणुकीत फायदेशीर ठरणार आहे.
प्रमुख नेत्यांच्या सभांनी वातावरण तापणार
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आगामी निवडणूक पारंपरिक सत्ताधाऱ्यांसाठी आपली पकड कायम ठेवण्याचे आव्हान तर नवीन चेहऱ्यांसाठी संधी घेऊन येत आहे. निवडणूक काळात प्रमुख नेत्यांच्या सभांनी वातावरण तापणार असून सद्यस्थितीत डिजिटल प्रचार अनुभवायला मिळत आहे.
देवदर्शनाच्या ट्रिप
राजकीय पक्ष फुटीनंतर तालुक्यातील नेतेही पक्षाच्या विचारधारेप्रमाणे विभागले आहेत. सद्य:स्थितीत खेड तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार, उद्धवसेना, शिंदेसेने, भाजप, काँग्रेस, मनसे तसेच इतर पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार तयारी करत आहेत. काहींनी मतदारांना देवदर्शनाच्या ट्रिप आयोजित केल्या आहेत. तर काही जण विकासकामांची भूमिपूजने करण्यात व्यस्त आहेत.
तालुक्यातील हाय व्होल्टेज लढत
तालुक्यातील मरकळ - शेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. सदरचा गट माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असून यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे या सदस्य राहिल्या आहेत. मात्र सध्या आमदार बाबाजी काळे यांनी या गटात विशेष लक्ष घालून हा गट काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्याच्या राजकारणातील अनेक बड्या हस्ती या गटात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून, त्यांची जोरदार तयारी सुरू आहे.
: बलाबल (सन २०१७ निवडणूक)
जिल्हा परिषद
- शिवसेना : ३
- राष्ट्रवादी काँग्रेस : २
- भाजप : २
पंचायत समिती :
- शिवसेना : ८
- राष्ट्रवादी काँग्रेस : ४
- भाजप : १
- काँग्रेस : १