चौफुला कोंडीत नागरिक त्रस्त; दोन मिनिटांचा रस्ता, १५ मिनिटांचा प्रवास..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:23 IST2025-10-28T18:23:28+5:302025-10-28T18:23:41+5:30
- अतिक्रमण हटवा, पूल रुंद करा: चौफुला कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांची मागणी

चौफुला कोंडीत नागरिक त्रस्त; दोन मिनिटांचा रस्ता, १५ मिनिटांचा प्रवास..!
वरवंड : अहमदनगर-शिरूर-सातारा राज्य महामार्गावरील चौफुला परिसरात दररोज वाहतूक कोंडीने प्रवाशांची डोकेदुखी वाढत आहे. पुणे, बारामती, सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि अष्टविनायक मार्गावरील जेजुरीसारख्या प्रमुख ठिकाणी जाण्यासाठी हजारो वाहने या मार्गावरून वाहतूक होत असल्याने ‘चौफुला’ हा एक प्रमुख वाहतूक केंद्र ठरला आहे. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमण, अव्यवस्थित पार्किंग आणि खडकवासला कालव्यावरील अरुंद पुलामुळे ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे.
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी छोट्या अंतरासाठीही प्रवाशांना दीर्घकाळ थांबावे लागते. दोन मिनिटांचा रस्ता ओलांडण्यासाठी १० ते १५ मिनिटे खर्च होतात, ज्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.
चौफुला परिसर हा पुणे जिल्ह्यातील एक व्यस्त महामार्गाचा टप्पा आहे. पुण्याहून सातारा, अहमदनगर आणि शेजारच्या जिल्ह्यांत जाणारी वाहने येथून वाहतूक होतात. दैनंदिन प्रवासी, शाळकरी मुले, व्यावसायिक आणि पर्यटक यांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण. स्थानिक व्यावसायिक आणि दुकानदारांनी दुकानांसमोर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहने उभी केल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे मोठ्या वाहनांना मार्ग काढणे कठीण जाते आणि कोंडी निर्माण होते.
प्रवाशांचा संताप : वेळ आणि इंधनाचा अपव्यय
चौफुला परिसरातील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो. सकाळी शाळकरी मुलांसह ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि संध्याकाळी घरी परतणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ‘‘दोन मिनिटांचा रस्ता ओलांडण्यासाठी १५ मिनिटे लागतात. यामुळे मी दररोज एक तास उधळतो’’, असे एका प्रवाशाने सांगितले.
दुसरीकडे, इंधनाचा अपव्यय होत असल्याने पर्यावरणावरही परिणाम होतो. स्थानिक व्यावसायिकांच्या अव्यवस्थित पार्किंगमुळे छोटी वाहनेही मोठ्या वाहनांमध्ये अडकतात. भाजी-फळ विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यावर अडथळे निर्माण केले आहेत, ज्यामुळे वाहतूक शिस्तीचा अभाव दिसतो.
अतिक्रमण हटवा, पूल रुंद करा
नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवावा, अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, नवीन सिग्नल प्रणाली, मार्गदर्शक फलक आणि वाहतूक शिस्त मोहीम राबवाव्यात, असे नागरिक सांगतात. ‘‘दररोज हजारो प्रवासी आणि शाळकरी मुले या मार्गावरून जातात. लहान अपघातांची शक्यता कायम आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे’’, असे स्थानिकांचे मत आहे.
मी दोन दिवसांपूर्वी सुपेवरून वरवंडकडे येत असताना चौफुला येथे अवघ्या ३ किलोमीटरसाठी दोन तास वाहतूक कोंडीत अडकलेलो होतो. या समस्येसाठी स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाने मिळून उपाययोजना करणे गरजेचे आहे. सुपा रोडवर मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर पार्क केली जातात, यासाठी वेगळे पार्किंग स्पॉट तयार करावेत. तसेच, रस्त्याचे रुंदीकरण आणि खडकवासला कालव्यावरील पुलाची रुंदी वाढवणे अत्यावश्यक आहे. यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जाणे सोपे होईल. - दत्ता दिवेकर, स्थानिक नागरिक, वरवंड
‘‘वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारे हॉटेल व्यावसायिक, भाजी-फळ विक्रेते यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. केडगाव रोडवरील हर्ष हॉस्पिटलपर्यंत डिव्हायडर काढण्याची गरज आहे, कारण मोठी अवजड वाहने वळताना अडथळा येतो. यामुळे कोंडी होते. आम्ही वाहतूक शिस्तीसाठी प्रयत्न करत आहोत, पण अतिक्रमण हटवण्यासाठी विभागीय सहकार्य आवश्यक आहे. - अशोक सोडगीर, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा