मोशीतील अपुऱ्या दुरुस्तीचे भोग नागरिकांना; रस्त्यावरील खडीमुळे अपघातांची मालिका सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:50 IST2025-08-08T16:50:11+5:302025-08-08T16:50:24+5:30
- पालिकेच्या ढिसाळ कामामुळे नागरिक धोक्यात; दररोज अपघात, वाढते धूळप्रदूषण आणि जीवितहानीचा धोका

मोशीतील अपुऱ्या दुरुस्तीचे भोग नागरिकांना; रस्त्यावरील खडीमुळे अपघातांची मालिका सुरूच
- राजेश नागरे
मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेला मोशी परिसर सध्या मृत्यूचा सापळा ठरत आहे. बीआरटी रस्त्यावर पालिकेच्या ढिसाळ कामामुळे रस्त्यावर उघड्यावर आलेली बारीक खडी ही येथील वाहनचालकांसाठी धोका बनली आहे. या खड्ड्यावरून घसरून दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात जखमी होत असून, दररोज तीन ते चार अपघातांची नोंद होत असल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे.
भारतमाता चौकात गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर पडलेले खड्डे अद्यापही कायम आहेत. पालिकेने फक्त खडी, माती आणि काँक्रेट टाकून खड्डे बुजवले. मात्र, पावसामुळे खड्ड्यांतील खडी व माती वेगळी होऊन ती रस्त्यावर पसरली आहे. या बारीक खडीमुळे वाहने घसरत असून, दुचाकीस्वार प्रामुख्याने बळी पडत आहेत.
मागील महिन्यात चाकण एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनिअरचा या रस्त्यावरच झालेला अपघात अजूनही ताजा आहे. बुधवारीही एक दाम्पत्य दुचाकीवरून घसरून गंभीर जखमी झाले. अनेक पालक लहान मुलांना शाळेत नेताना या खडीमुळे धोक्याच्या सावटाखाली येत आहेत. हे सगळं पाहता, प्रशासन किती बेजबाबदार आहे? हे अधोरेखित होते.
रस्त्यावर साचलेल्या खडी आणि मुरूमामुळे परिसरात दिवसेंदिवस धुळीचे प्रमाण वाढले आहे. सततचा धुरळा यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दुचाकीस्वार विशेषतः त्रस्त झाले आहेत.
कामावर प्रश्नचिन्ह
दोन महिन्यांपूर्वी केलेली खड्डे बुजवण्याची कामे फसवी ठरली असून, ही खडी पुन्हा रस्त्यावर आली आहे. अशा अपूर्ण कामांमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. पालिकेने वेळेत कारवाई न केल्यास याचा फटका नागरिकांच्या जिवावर बेतू शकतो.
उपाययोजना करण्याची मागणी
रस्त्यावर साचलेली खडी त्वरित हटवावी, अपघातप्रवण ठिकाणी फलक लावावेत आणि खड्ड्यांची योग्य डांबरीकरण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आता नागरिक करत आहेत. अन्यथा, नागरिकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागेल, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी.