राहुल गांधींच्या आरोपामागे सलीम-जावेदची स्क्रिप्ट ? फडणवीसांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:10 IST2025-08-08T19:09:30+5:302025-08-08T19:10:37+5:30
ते बोलत असलेल्या सर्व गोष्टी कपोलकल्पित आहेत. सगळ्यांचे त्यातून मनोरंजन होत आहे. सलीम जावेद यांची एखादी स्क्रिप्ट त्यांनी घेतली असावी.

राहुल गांधींच्या आरोपामागे सलीम-जावेदची स्क्रिप्ट ? फडणवीसांची खोचक टीका
पुणे : राहुल गांधी जे आरोप निवडणूक आयोगावर करत आहेत, त्यात मनोरंजनाशिवाय दुसरे काहीही नाही, त्यांनी बहुधा सलीम जावेद यांच्याकडून एखादी स्क्रिप्ट घेतली असावी, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आयोगाकडून मतांची चोरी या आरोपाची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी दिल्लीच्या बैठकीतील हजेरीवरून टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी दिवसभर पुण्यात होते. वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती होती. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी राहुल गांधी निवडणूक आयोगावर करत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ते बोलत असलेल्या सर्व गोष्टी कपोलकल्पित आहेत. सगळ्यांचे त्यातून मनोरंजन होत आहे. सलीम जावेद यांची एखादी स्क्रिप्ट त्यांनी घेतली असावी. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया वगैरेविषयी विस्तृत माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र राहुल गांधी त्यासाठी नकार देत आहेत, त्यांना ते मान्य नाही. हरण्याचे काहीतरी कारण लागते, ते त्यांनी शोधून काढले आहे व तेच सर्वांन सांगत फिरत आहेत.
दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी त्यांच्या जाहीर पत्रकार परिषदेतील सादरीकरण पुन्हा एकदा इंडिया आघाडीतील सर्व सदस्य पक्षप्रमुखांना दाखवले. या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे मागील रांगेत बसले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या रांगेतील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. त्याविषयी विचारले असता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.
भाषणांमध्ये मोठमोठी वाक्ये ते वापरतात. दिल्लीसमोर झुकणार नाही वगैरे म्हणतात, प्रत्यक्षात तिथे त्यांना काय वागणूक मिळाली ते दिसते. आमच्याकडे ते होते त्या वेळी पहिल्या रांगेत असायचे. आमच्यापेक्षा त्यांना जास्त मान असायचा. आता तिथे काय मान मिळतो ते दिसले आहे. काँग्रेस सत्तेत नसताना ही स्थिती आहे. ती पाहून दु:ख होते.’’