पुणे : पुण्यातील ढोल-ताशा पथकांमध्ये तरुणाईची मोठी संख्या आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पथके पाहिली, पण पुण्यासारखी ढोल- ताशा पथके कुठेही नाहीत. पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत. तसे असतील तर ते नक्की थांबवू. यावर्षी पारंपरिक वाद्यांवर खटले दाखल होणार नाहीत असे आश्वासन पुण्याचे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी ढोल-ताशा महासंघाला दिले. मागील वर्षी लेझर लाइट बंद करण्यात आम्ही यशस्वी झालो, यावर्षी डीजे बंद करता आले तर प्रयत्न करूया, असेही ते म्हणाले.
ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रतर्फेपुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला. यावेळी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कसबा गणपती मंदिराचे मुख्य विश्वस्त विनायक ठकार, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी उपस्थित होते. महासंघाचे ॲॅड. शिरीष थिटे, विलास शिगवण, अक्षय बलकवडे, अमर भालेराव, ओंकार कलढोणकर आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रमुख व विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रंजनकुमार शर्मा म्हणाले, जेव्हा ढोल-ताशा पथके सराव करतात. तेव्हा रात्री १० नंतर पोलिस मुख्यालयात तक्रारींचे सर्वाधिक दूरध्वनी येतात. त्यामुळे सर्व पथकांनी आपला सराव लवकर सुरू करून रात्री १० पूर्वी बंद करणे गरजेचे आहे. आज आपल्या पारंपरिक गोष्टी जागतिक स्तरावर जात आहेत. ढोल-ताशादेखील जागतिक स्तरावर पोहोचला असून पुण्यातील २७ हजार वादकांच्या शक्तीचा उपयोग उत्सव काळात कसा करता येईल, हेदेखील पाहू.
कृषिकेश रावले म्हणाले, ढोल-ताशा पथकातील वादकांचा वादन करताना आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हावा, हा उद्देश नसतो. पुण्याच्या गणेशोत्सवात पोलिसांचे काम अवघड आहे, असे मी वरिष्ठांकडून ऐकले आहे. मात्र, आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अडचण न येता, हा उत्सव आपण साजरा करू. या करिता लवकरच बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
पराग ठाकूर म्हणाले, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांत अनेक ठिकाणी पुण्याची ढोल-ताशा संस्कृती पोहोचली आहे. ढोल-ताशा ही महाराष्ट्राची ओळख आहे. डीजेमुक्त उत्सव साजरा करायचा असेल, तर सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. त्याकरिता पथकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे बरेच पथक, टिपरी, घुंगुरकाठी पथक सहभागी करून घ्यायला हवे.