सहकारी संस्थेतील गैरकारभाराविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:59 IST2025-09-17T15:57:19+5:302025-09-17T15:59:25+5:30
ही घटना डिसेंबर २०२१ पासून ते १३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत वाकड येथील ओमेगा पॅराडाईज सहकारी संस्था फेज एक येथे घडली आहे.

सहकारी संस्थेतील गैरकारभाराविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : एका सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या देखभाल शुल्क (मेंटेनन्स चार्जेस) आणि इतर शुल्क वसूल केले. ही घटना डिसेंबर २०२१ पासून ते १३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत वाकड येथील ओमेगा पॅराडाईज सहकारी संस्था फेज एक येथे घडली आहे.
सुमित ललितकुमार भाटिया (वय ४७, रा. ओमेगा पॅराडाईज, वाकड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सोसायटीचे चेअरमन, ट्रेझरर, सेक्रेटरी, पदाधिकाऱ्यांसह एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यात सोसायटी चेअरमन अरविंदकुमार बनवारीलाल सचदेवा, ट्रेझरर अमोल भास्कर पाटील, सेक्रेटरी शैलेश शरद राजहंस यांच्यासह अरुण सदाशिव दळवी, हरिहरन वेणुगोपाल, अशोककुमार गोविंदकुमार मिश्रा, मिलिंद देविदास पांडे, सचिन विष्णुपंत पांडे, दिनेश मधुकर पंडित, संजय दत्तात्रय पवार, रामेश्वर सत्यनारायण झंवर, योगेश देविदास पाटील, पवन वल्लभदास शारदा, अर्चना अरविंदकुमार सिंह, अरुंधती मुकुलगंधे आणि तत्कालीन लेखापरीक्षक राधा सुनील तुंगे यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये नवीन समिती निवडून आले. दरम्यान, गृहनिर्माण संस्थेच्या ए, बी, सी, डी, आय, जे, के इमारतीचे कामकाज फिर्यादी सुमित भाटिया यांच्या कार्यकारिणी समितीतर्फे सुरू असताना नवनिर्वाचित समितीने सर्व ११ इमारतींचे कामकाज समांतररीत्या सुरू केले. त्यांनी जुन्या समितीच्या कार्यकाळात, म्हणजे एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळात, कोणताही अधिकार नसतानाही काही इमारतींमधील रहिवाशांकडून देखभाल शुल्क आणि इतर शुल्क जमा करण्यास सुरुवात केली. रहिवाशांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना धमक्या दिल्या आणि बेकायदेशीर वसुलीच्या नोटीस पाठवल्या.
जर शुल्क भरले नाही तर सर्व सुविधा बंद करण्याची धमकी दिली. या धमक्यांमुळे काही रहिवाशांनी घाबरून ५७ लाख ४९ हजार ७३९ रुपये भरले. या काळात जुनी वेल्फेअर सोसायटी कार्यरत असतानादेखील, संशयित मॅनेजिंग कमिटीने १७५ सदनिकाधारकांकडून ही रक्कम बळजबरीने वसूल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद गज्जेवार तपास करीत आहेत.