व्यवहार रद्द करा,अन्यथा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करणार; आचार्य गुप्तिनंदी महाराजांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 20:16 IST2025-11-12T20:16:07+5:302025-11-12T20:16:32+5:30
ही प्रक्रिया दोन दिवसांत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उपोषण करण्यात येईल,' असा इशारा आचार्य गुप्तिनंदी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला.

व्यवहार रद्द करा,अन्यथा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करणार; आचार्य गुप्तिनंदी महाराजांचा इशारा
पुणे : जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीसाठी झालेला व्यवहार रद्द करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि विश्वस्त या दोघांनीही न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर दोन दिवसांत निर्णय घेऊन, आम्हाला अंतिम 'लीगल डीड'ची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. ही प्रक्रिया दोन दिवसांत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उपोषण करण्यात येईल,' असा इशारा आचार्य गुप्तिनंदी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जैन विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग आणि भगवान महावीर मंदिर असलेली जमीन मॉडेल कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये आहे. पुण्यातील गोखले लँडमार्क्स एलएलपीने सेठ हिरचंद नेमचंद मेमोरियल ट्रस्टकडून ३११ कोटी रुपयांना विकत घेतली होती. एकूण रकमेपैकी २३० कोटी रुपये ट्रस्टला देण्यात आले होते. या कराराला विद्यार्थी, माजी विद्यार्थी, साधू आणि जैन समुदायाच्या इतर सदस्यांकडून तीव्र विरोध झाला, ज्यामुळे जैन समुदायाच्या विरोधानंतर गोखले लँडमार्क्स एलएलपी आणि सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर स्मारक ट्रस्टने विक्री करार रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
गुप्तिनंदी महाराज म्हणाले, 'जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीसाठी झालेला व्यवहार रद्द करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी मुदत ठरवून दिली आहे. मात्र, ती संपत असून, व्यवहार रद्द झाल्याचा कागदोपत्री निर्णय अजूनही आमच्या हाती नाही. व्यवहार रद्द करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि विश्वस्त या दोघांनीही उशिराने (दहा दिवसांनी) न्यायालयात कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय येण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे.'
'याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित प्रक्रिया तातडीने होण्यासाठी सूचना द्याव्यात. ही प्रक्रिया पुढील दोन दिवसांत न झाल्यास आचार्य गुणधरनंदिजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उपोषण करण्यात येईल,' असेही गुप्तिनंदी महाराज यांनी सांगितले.