Pune traffic : उदंड झाल्या कॅब अन् रिक्षा; पुणेकरांना कोंडीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:22 IST2025-07-24T15:22:21+5:302025-07-24T15:22:31+5:30
वाहतूककोंडी अन् पार्किंगच्या त्रासाला पुणेकर आधीच वैतागले आहेत. परंतु ओला, उबेर या खासगी कंपनीच्या माध्यमातून सहज रोजगार उपलब्ध होत असल्याने कॅबचालकांची संख्या भरमसाट वाढली आहे.

Pune traffic : उदंड झाल्या कॅब अन् रिक्षा; पुणेकरांना कोंडीची शिक्षा
- अंबादास गवंडी
पुणे : नागरिकांना सहज उपलब्ध होणाऱ्या कॅबमुळे शहरातील कॅबची संख्या भरमसाट वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जटिल होत आहे. त्यातच भर म्हणून कॅब आणि रिक्षाचालक प्रवासी शाेधण्यासाठी भर रस्त्यांवर वाहन उभे करतात. त्यामुळे शहरातील फर्ग्युसन, बाजीराव, टिळक रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड यांसह इतर प्रमुख रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना यातून मार्ग काढताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
वाहतूककोंडी अन् पार्किंगच्या त्रासाला पुणेकर आधीच वैतागले आहेत. परंतु ओला, उबेर या खासगी कंपनीच्या माध्यमातून सहज रोजगार उपलब्ध होत असल्याने कॅबचालकांची संख्या भरमसाट वाढली आहे. दुसरीकडे मुक्तपरवाना धोरणामुळे रिक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे वाहन लावण्यासाठी शहरात पार्किंगची असलेली सोय कमी पडत आहे, तर दुसरीकडे वेळेत कॅब उपलब्ध होत असल्याने प्रवाशांचा ओढा कॅबकडे वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या प्रमाणात कॅबची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.
पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध असताना प्रवाशांचा ओढा वाढला आहे. त्याच संधीचा फायदा कॅबचालक घेत आहेत. परंतु, प्रवासी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कॅब व रिक्षा मुख्य रस्त्यावर बिनधास्त उभे करण्यात येते. त्यामुळे शहरातील वाढलेल्या वाहनांमुळे रस्त्यांंवर भार पडत आहेत.
नव्या उद्योजकांमुळे कॅबच्या संख्येत भर
शहरात जवळपास ७० हजार कॅबची वाहने असून, कॅबची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या सुमारे २० आहेत. ही वाढ मागील दीड ते दोन वर्षांत झाली. त्यामुळे ओला, उबेर या कंपन्यांची मक्तेदारी कमी झाली आहे. शिवाय नवीन उद्योजक कॅब व्यवसायात सामील झाल्याने कॅबची संख्या वाढली आहे. शहरात दररोज कॅबच्या माध्यमातून सुमारे ५ ते ६ लाख नागरिक यातून प्रवास करीत आहेत. परंतु, त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे शिस्तीने पालन होत नसल्याने कोंडीत भर पडत आहे, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘कॅब’वाढीची ही आहेत कारणे :
- ऑनलाइन बुक केल्यावर वेळेत उपलब्ध होते.
- जवळचा किंवा लांबचा प्रवास असले तरी सोयीचे.
- तरुणांना सहज रोजगार उपलब्ध होतो.
- दिवसेंदिवस प्रवाशांचा ओढा वाढत आहे.
- काही रिक्षाचालक कॅब व्यवसायाकडे वळले.
‘कॅब’मुळे कोंडी होण्याची ही आहेत कारणे :
- प्रवासी सोडल्यावर पुन्हा प्रवासी शोधतात.
- यात बराच वेळ रस्त्यांवर थांबतात.
- अनेकवेळा प्रवासी लवकर भेटत नाही.
- मुख्य रस्त्यावर पार्किंगची सोय नाही.
- गल्लीबोळात कॅब पार्क केले जातात.
सार्वजनिक वाहतूक आणि प्रवासी
वाहन प्रवासी संख्या (दैनंदिन सरासरी)
- पीएमपी : १० लाख
- मेट्रो : १ लाख ७० हजार
- रिक्षा : २० लाख
- कॅब : ६ लाख
ओला, उबेर यांच्या गाड्यांना टुरिस्ट परमिट आहे. रिक्षांना काही प्रमाणात थांबे आहेत, परंतु कॅबचालकांना थांबा नाही. तसेच बाहेर शहरातील कॅबधारकांची संख्या पुण्यात वाढली आहे. कॅबचालकांना सिटी परमिट नसून, टुरिस्ट परमिट आहे. तरीही शहरात व्यवसाय करतात. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत होतो. - आबा बाबर, शिवनेरी रिक्षा संघटना