आई धुणं-भांडी करते, बाप शेतकरी;जिद्द, चिकाटी अन् कठोर परिश्रमाच्या जोरावर शिल्पा बनली सीए
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:54 IST2025-07-06T18:54:04+5:302025-07-06T18:54:37+5:30
शिल्पाचे वडील राजेंद्र कातुर्डे शेती करतात, तर आई सुशिला घरकाम आणि धुण्याभांड्याचे काम करून कुटुंब चालवते. शिल्पाची आई सहावीपर्यंत आणि वडील दहावीपर्यंत शिकले आहेत.

आई धुणं-भांडी करते, बाप शेतकरी;जिद्द, चिकाटी अन् कठोर परिश्रमाच्या जोरावर शिल्पा बनली सीए
पानशेत - कोंढावळे बुद्रुक (ता. राजगड) येथील शेतकरी कुटुंबातील शिल्पा राजेंद्र कातुर्डे हिने कठीण परिस्थितीवर मात करत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शिल्पाने हे स्वप्न साकारले.
शिल्पाचे वडील राजेंद्र कातुर्डे शेती करतात, तर आई सुशिला घरकाम आणि धुण्याभांड्याचे काम करून कुटुंब चालवते. शिल्पाची आई सहावीपर्यंत आणि वडील दहावीपर्यंत शिकले आहेत. मात्र मुलगी हुशार असल्याचे लक्षात घेऊन तिच्या शिक्षणात कधीच अडथळा येऊ दिला नाही. शिल्पाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढावळे बुद्रुक येथून शिक्षणाची सुरुवात केली. पुढे सीए होण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तिने लायब्ररीत अभ्यास केला, घरकाम आणि शेतकामात आईवडिलांना मदत केली आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.
आपल्या यशाबद्दल शिल्पा म्हणाली, आई-वडील आणि काका संदिप कातुर्डे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. पहिल्या प्रयत्नात प्राथमिक परीक्षा पास झाले, पण पुढील टप्प्यात खूप मेहनत घ्यावी लागली. सातत्य, आईवडिलांचे आशीर्वाद आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावरच हे यश मिळाले. शिल्पाच्या या यशामुळे कोंढावळे गावासह संपूर्ण राजगड तालुक्यात कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.