कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आकाश ढेंगे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:45 IST2025-11-04T15:43:29+5:302025-11-04T15:45:02+5:30
- आकाश ढेंगे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत.

कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आकाश ढेंगे निलंबित
पुणे :पुणे महापालिकेच्या हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या शेवाळेवाडी, मांजरी या भागातील मलनि:स्सारण व देखभाल, दुरुस्तीविषयक कामकाजात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मलनि:स्सारण आणि देखभाल दुरुस्ती विभागातील शाखा अभियंता आकाश ढेंगे यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आकाश ढेंगे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शेवाळेवाडी, मांजरी या भागातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी मलनि:स्सारण व देखभाल, दुरुस्ती विभागाच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामध्ये रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या मलनि:स्सारण विभागाच्या तुटलेल्या चेंबर्सची दुरुस्ती न करणे, तुटलेले चेंबर्स धोकादायक स्थितीमध्ये ठेवणे, धोकादायक स्थितीमधील चेंबर्समुळे नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न झालेला असणे, सोलापूर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डक्टची साफसफाई न करणे अशा विविध बाबी आयुक्तांच्या निदर्शनास आल्या होत्या. त्याबाबत मलनि:स्सारण विभागाचे मुख्य अभियंता यांनी त्याबाबत अहवाल सादर केला. त्यामध्ये या सर्व कामांची जबाबदारी आकाश ढेंगे यांची असताना त्यांनी या कामामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे, कामामध्ये निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शाखा अभियंता आकाश ढेंगे यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ढेंगे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत.
दिव्यांगाचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार केली होती...
मलनि:स्सारण आणि देखभाल, दुरुस्ती विभागातील कनिष्ठ अभियंता आकाश ढेंगे यांच्याकडे दोन दिव्यांग प्रमाणपत्र असल्याचे उघडकीस आले आहे. ही दोन्ही दिव्यांग प्रमाणपत्र छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) जिल्हा रुग्णालयातून मिळालेली आहेत. त्यातील पहिले दिव्यांग प्रमाणपत्र २१ डिसेंबर २०१६ रोजीचे असून, त्यावर दिव्यांगत्वाचे प्रमाण ६३ टक्के आहे. तर दुसरे प्रमाणपत्र २० जानेवारी २०१७ रोजीचे असून, त्यावर दिव्यांगत्वाचे प्रमाण ५५ टक्के आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही प्रमाणपत्रे एकाच डॉक्टरांनी दिलेली आहेत. या दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत पुणे महापालिकेकडे लिखित स्वरूपात तक्रार करण्यात आली होती.