‘बोगस लाडक्या बहिणी’हा निवडणूकपूर्व मोठा आर्थिक घोटाळाच; ‘आप’चा आरोप

By राजू हिंगे | Updated: June 4, 2025 19:27 IST2025-06-04T19:25:41+5:302025-06-04T19:27:36+5:30

सरसकट पैसे देणे ही चूक झाली तर प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही? पाचशे कोटींचा निवडणूकपूर्व आमिष घोटाळा?‘आप’चा सवाल

pune news bogus Ladkya Bahini is a big pre-election financial scam; AAP alleges | ‘बोगस लाडक्या बहिणी’हा निवडणूकपूर्व मोठा आर्थिक घोटाळाच; ‘आप’चा आरोप

‘बोगस लाडक्या बहिणी’हा निवडणूकपूर्व मोठा आर्थिक घोटाळाच; ‘आप’चा आरोप

पुणे : गेल्या वर्षी महायुती सरकारला प्रचंड बहुमत आणि मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर महिलांचे मतदान मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेमधून बोगस आणि अपात्र महिलांना पैसे देणे हा निवडणूकपूर्व मोठा आर्थिक घोटाळाच होता, असा आरोप मंगळवारी (दि. ३) आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला राज्य सरकारी कर्मचारी तसेच आर्थिक निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज प्रामुख्याने महायुतीच्या भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टॉल लावून, पक्ष कार्यालयातून भरले. हे सर्व अर्ज निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती भरून पूर्ण केले गेले. त्यामुळे अपात्र महिलांनाही पात्र ठरविण्यामागे मुख्यत्वे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेच होते. इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यापासून दूर राहणेच पसंत केले होते. आता मात्र याच्यातून तब्बल २० लाख महिला या अपात्र ठरविल्या जाणार, असे उघड झालेल्या आकडेवारीवरून दिसते आहे. त्यामुळे या बोगस, अपात्र महिलांना निवडणुकीतील आमिष म्हणूनच कोट्यवधी रकमेचे वाटप केले गेले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ज्यावेळी ही योजना आणली त्यावेळी आमच्याकडे फार कमी काळ होता. दोन-तीन महिन्यांत लगेच निवडणुका लागणार होत्या. त्यामुळे काहींनी अर्ज केले. आता दिलेले पैसे काढून घेण्याचा प्रश्न येत नाही. मान्य आहे चूक झाली,’ असे स्पष्टीकरण दिले आहे. या अपात्र महिलांवर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु, ज्या खात्याच्या मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी संगनमताने हे अर्ज मान्य केले व त्यांचे नावे पैसे दिले त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी पैसे देताना त्याची व्यवस्थित तपासणी करूनच पैसे देऊ, असे फडणवीस यांनी सातत्याने सांगितले होते. या लाडकी बहीण योजनेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास ४ हजार ८०० कोटींची रक्कम वितरित झाली असल्याची आकडेवारी पाहता ५०० कोटींपेक्षा अधिकचा हा भ्रष्टाचार असू शकतो, असे ‘आप’चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

Web Title: pune news bogus Ladkya Bahini is a big pre-election financial scam; AAP alleges