भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठीच प्रारूप प्रभागरचना सेफ; हरकतीच्या सुनावणीसाठी भाजपचेच कार्यकर्ते जास्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 10:19 IST2025-09-12T10:14:56+5:302025-09-12T10:19:58+5:30

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसाठीच ही प्रारूप प्रभागरचना सेफ आणि माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांसाठी अनसेफ असल्याचे सुनावणीवरून स्पष्ट झाले आहे.

pune news bjp workers are more likely to attend the objection hearing | भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठीच प्रारूप प्रभागरचना सेफ; हरकतीच्या सुनावणीसाठी भाजपचेच कार्यकर्ते जास्त 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठीच प्रारूप प्रभागरचना सेफ; हरकतीच्या सुनावणीसाठी भाजपचेच कार्यकर्ते जास्त 

पुणे :पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचना भाजप- शिवसेनेच्या शिंदे गटाला अनुकूल झाल्याचा आरोप करण्यात आला; पण या हरकती आणि सूचनांच्या सुनावणीवेळी भाजपच्या माजी नगरसेवकासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते. त्यामुळे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसाठीच ही प्रारूप प्रभागरचना सेफ आणि माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांसाठी अनसेफ असल्याचे सुनावणीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रभाग क्रमांक १ ते २९ या प्रभागाच्या प्रारूपरचनेवरील हरकती आणि सूचनांची सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाली. पालिकेची प्रभागरचना करताना भाजपने विश्वासात न घेता परस्पर प्रभागरचना करून घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदेसेनेने केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा कारभार असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांमध्ये काही बदल करीत शिवसेनेला फायद्याचे ठरतील, असे काही प्रभाग झाले आहेत.

महापालिकेत भाजपचे माजी पदाधिकारी प्रभागरचनेसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी प्रभागरचना अनुकूल करून घेतली आहे; पण भाजपचे काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना प्रभागरचना अनुकूल नाही. त्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने सोईस्कर प्रभागरचना केल्याचा राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितल्याने राजकीय हस्तक्षेप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हरकती आणि सूचनांकडे लक्ष लागले होते. प्रभाग क्रमांक १ ते २९ या वरील हरकती सूचनांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक हजर होते; पण त्यात सर्वाधिक संख्या भाजपच्या कार्यकर्त्यांची होती. त्यात भाजपचे अनेक माजी नगरसेवक हरकती आणि सूचना नाेंदविण्यासाठी हजर होते. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपचे कार्यकर्तही प्रभागरचनेवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

...तर न्यायालयात जाणार

प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठेतील अुनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण बदलण्यासाठी सोईस्करपणे लोकसंख्येचे विभाजन केले गेले, यावर हरकत घेतली आहे; पण प्रभागरचना अंतिम करताना यामध्ये बदल झाला नाही, तर न्यायालयात जाणार असे सामाजिक कार्यकर्त चंद्रशेखर जावळे यांनी सांगितले.

आपला कसबा कुठंय?

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत कसबा हे नाव काेणत्याही प्रभागाला देण्यात आलेले नाही. पुणे म्हणजे कसबा पेठ, असे समीकरण आहे. त्यामुळे कसबा हे नाव नसल्यामुळे या भागातील नागरिक नाराज झाले आहेत. त्यामुळे हरकतीच्या सुनावणीवेळी प्रणव रवींद्र धंगेकर यांनी ‘आपला कसबा कुठंय?’ असा फलक झळकावून आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकीय द्वेषभावनेतून केलेल्या प्रभागरचनेत तोडफोड झाल्याच्या घटनेकडे लक्ष वेधले.

Web Title: pune news bjp workers are more likely to attend the objection hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.