पालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या संघटनात्मक पातळीवर बैठका सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:23 IST2025-12-11T11:22:44+5:302025-12-11T11:23:08+5:30
येत्या चार दिवसात उर्वरित प्रभागांच्या बैठका होणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून प्रभाग स्तरावरील राजकीय व संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.

पालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या संघटनात्मक पातळीवर बैठका सुरू
पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग आला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे प्रभागनिहाय पदाधिकारी बैठका घेत आहेत. प्रभाग क्रमांक १ ते ८ च्या बैठका पार पडल्या. येत्या चार दिवसात उर्वरित प्रभागांच्या बैठका होणार आहेत. या बैठकांच्या माध्यमातून प्रभाग स्तरावरील राजकीय व संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.
नागरिकांकडून थेट येणाऱ्या समस्या, स्थानिक पातळीवरील अडचणी, तसेच मतदारांच्या अपेक्षा समजून घेण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात येत आहे. या सर्व मुद्द्यांच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेला दिशा देण्याचे काम या बैठकीतून केले जात आहे. या बैठकीत बूथ रचना मजबुतीकरण, कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी, निवडणूक व्यवस्थापनाचे नियोजन, तसेच प्रत्येक प्रभागातील पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील विकासकामे यावर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे.
यासोबतच आगामी काळात प्रभागात राबविण्यात येणाऱ्या नव्या आणि आवश्यक विकासकामांची रूपरेषा ठरवली जात आहे. यावेळी शहर सरचिटणीस पुनित जोशी, सुशील मेंगडे, राघवेंद्र मानकर, विश्वास ननावरे, रवींद्र साळेगावकर, प्रिया शेंडगे, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.