महापालिकेच्या प्रभाग रचनेत भाजप नेत्यांचा हस्तक्षेप? महाविकास आघाडीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:37 IST2025-08-03T12:36:43+5:302025-08-03T12:37:00+5:30

नियम डावलून केलेल्या प्रभाग रचनेवर आम्ही अधिकाधिक हरकती घेणार असून, नगरविकास विभाग, निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, वेळप्रसंगी याविरोधात न्यायालयातही दाद मागू, असाही इशारा

pune news bjp leaders interference in the ward structure of the Municipal Corporation? Allegation by Mahavikas Aghadi | महापालिकेच्या प्रभाग रचनेत भाजप नेत्यांचा हस्तक्षेप? महाविकास आघाडीचा आरोप

महापालिकेच्या प्रभाग रचनेत भाजप नेत्यांचा हस्तक्षेप? महाविकास आघाडीचा आरोप

पुणे : महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या माजी सभागृह नेत्याने हस्तक्षेप केला असून, शासकीय विश्रामगृहावर भाजपच्या आमदार व नेत्यांना बोलावून त्यांना हवी तशी प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. नियम डावलून केलेल्या प्रभाग रचनेवर आम्ही अधिकाधिक हरकती घेणार असून, नगरविकास विभाग, निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, वेळप्रसंगी याविरोधात न्यायालयातही दाद मागू, असाही इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, उद्धवसेनेच्या शहराध्यक्षांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत प्रभाग रचना करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, उद्धवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

राष्ट्रवादीचे जगताप म्हणाले, प्रभाग रचना करताना मुख्य रस्ता, नदी, नाले, ओढे यांचा विचार करून प्रभागाच्या हद्दी निश्चित करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर दबाव टाकून प्रभागांची तोडफोड केली आहे. नियमांना पायदळी तुडवत भाजपला पोषक होईल, अशा पद्धतीने प्रभाग रचना केली आहे. सर्किट हाऊस येथे बसून भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने प्रभाग रचना केल्याची माहिती आहे. ही प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये चुकीचे प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याविरोधात हरकती नोंदवून नगरविकास विभागाकडे तक्रार नोंदविली जाणार आहे. तसेच वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेत दाददेखील मागणार असल्याचे जगताप म्हणाले.

काँग्रेसचे शिंदे म्हणाले, भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली प्रभाग रचना केली आहे. प्रभाग रचनेबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी, अशी मागणी वारंवार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करूनही त्यांनी वेळ दिली नाही. यावरून सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर किती दबाव आहे, हे लक्षात येते.

उद्धवसेनेचे मोरे व थरकुडे म्हणाले, भाजपची राज्यात, देशात सत्ता आहे. सोबतीला प्रशासन आहे, ईव्हीएम आहे. तरीही त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी प्रभाग रचनेचा अधार घ्यावा लागतो. मात्र, त्यांना पुणेकर महापालिका निवडणुकीत योग्य जागा दाखवतील.

निवडणूक आली की दंगल घडविणे, हा फंडा

निवडणूका जवळ आल्या की भाजपकडून जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू होते. निवडणुकीपूर्वी दंगल घडवून आणण्याचा फंडा भाजपचा आहे. दौंड तालुक्यातील यवत येथील दंगल ही भाजप पुरस्कृत होती, असा आरोप करत एखाद्या स्टेटसवरून एवढे वातावरण बिघडतेच कसे, मग सरकारची तपास यंत्रणा काय करते? यवतच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या आणि प्रक्षोभक भाषण करणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Web Title: pune news bjp leaders interference in the ward structure of the Municipal Corporation? Allegation by Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.