मतदारयादीत मोठा घोळ, आधी दुबार नावे हटवा; युवक काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 20:01 IST2025-12-04T19:59:39+5:302025-12-04T20:01:16+5:30
- आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना शहरातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत.

मतदारयादीत मोठा घोळ, आधी दुबार नावे हटवा; युवक काँग्रेसची मागणी
पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना शहरातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३८ (बालाजी नगर, कात्रज, आंबेगाव) मधील तपासणीत तब्बल ६,५०० नावे दुबार असल्याचे, तर सुमारे ३३,५०० मतदारांचे पत्ते चुकीचे, अपूर्ण किंवा अस्तित्वात नसल्याचे युवक काँग्रेसने केलेल्या मतदारयादी पडताळणीत आढळले आहे. या अनियमिततेवर युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली. दुबार व अवैध नावे तातडीने वगळावी, अन्यथा आयोगाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमिर शेख, युवक काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, रवी पांडे आणि विद्यार्थी काँग्रेसचे भूषण रानभरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
याचप्रमाणे प्रभाग २९ मध्येही मोठ्या प्रमाणावर चुका समोर आल्या असून, ३,००० हून अधिक नावे दुबार नोंदवली गेली आहेत. याशिवाय १४,००० मतदारांच्या पत्त्यांसमोर ‘एनए’ असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले. प्रभाग २० मध्ये १,५०० पेक्षा जास्त नावे दुबार असल्याचे आणि अनेक नोंदी अपूर्ण असल्याचे आढळले. प्राथमिक आढाव्यात संपूर्ण शहरातील मतदारयादीची स्थिती गंभीर असल्याचे युवक काँग्रेसने स्पष्ट केले. आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आमिर शेख म्हणाले, ‘देशभरातील मतदार यादीतील गोंधळाबाबत राहुल गांधी सातत्याने बोलत आहेत. पुण्यातील तपासणीतही मोठ्या प्रमाणावर घोळ दिसून येत आहेत. स्वतः भूषण रानभरे यांच्या नावाचीही यादीत दुबार नोंद असून, अशा स्थितीत त्यांच्या जागी इतर कोणीतरी मतदान केल्यास त्यांच्या मताची वैधता धोक्यात येऊ शकते.
भूषण रानभरे म्हणाले, ‘प्रभाग ३८ मध्ये हजारो मतदारांचे पत्ते चुकीचे असून एवढ्या मोठ्या यादीत अशा त्रुटी असणे गंभीर बाब आहे. चुकीची किंवा पुनरावृत्त नावे थेट गैरप्रकारांना आमंत्रण देतात.’
अक्षय जैन म्हणाले , ‘निवडणूक आयोगाने व्यवस्थित पडताळणी करणे आवश्यक असताना ते आमच्याच माध्यमातून का करावे लागते? तसेच मतदारयादीचा संवेदनशील ॲक्सेस खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे बेकायदेशीर नसल्याची खात्री आयोगाने द्यावी.’