भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:28 IST2025-11-08T16:09:58+5:302025-11-08T16:28:26+5:30
आगामी काळात पाण्याची टंचाई कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीतील रिचार्जमुळे भविष्यात टँकरवर होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे.

भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली
भोर : भोर तालुक्यात यंदा सरासरीच्या १२३.६ टक्के पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत चार फुटांच्या वाढीची नोंद झाली आहे. जमिनीतील रिचार्ज वाढल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा खर्च वाचणार आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सातत्याने भूजल पातळीचे निरीक्षण केले जाते. यंदा सततच्या अतिवृष्टीमुळे बहुतांश प्रकल्प, विहिरी, बोअरवेल आणि शेततळे पाण्याने भरलेली आहेत. तरी जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून, आगामी काळात पाण्याची टंचाई कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीतील रिचार्जमुळे भविष्यात टँकरवर होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे.
भोर तालुक्यात यंदा सरासरीच्या १२३.६ टक्के पाऊस झाला आहे, त्यामुळे भूजल पातळी चार फुटांनी वाढली आहे. भोर आणि राजगड तालुक्यांमधील नीरा, देवघर, भाटघर, गुंजवणी प्रकल्पांत १०० टक्के साठा आहे. याशिवाय तलाव, शेततळे पाण्याने भरले आहेत, तर बोअरवेल आणि विहिरींनाही भरपूर पाणी मिळाले आहे.
भोर तालुक्यात मे महिन्यात सरासरी २२.३० मिमी पाऊस यावर्षी २०३.८० मिमी नोंदला, म्हणजे ९१३.९ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जूनमध्ये सरासरी ४१५.६० मिमी विरुद्ध २०५.५० मिमी नोंद झाली, म्हणजे २०२ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात सरासरी ३७३ मिमी विरुद्ध ३६६ मिमी नोंदला (१०२ टक्के), ऑगस्टमध्ये सरासरी १८० मिमी विरुद्ध २७४ मिमी (६५ टक्के), सप्टेंबरमध्ये सरासरी १३६ मिमी विरुद्ध १४२ मिमी (९२ टक्के), तर ऑक्टोबरमध्ये ४६.७० मिमी सरासरी विरुद्ध ८७.८० मिमी (४१ टक्के) पाऊस झाला आहे. अशा प्रकारे, मे ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत एकूण सरासरी १०९८.३० मिमी विरुद्ध १३९१.६० मिमी पाऊस झाला असून, अंदाजे १२३.६ टक्के पर्जन्यमान नोंदले गेले आहे.
मे २०२५ ते ऑक्टोबर २०२५ अखेर झालेल्या एकूण १३५१.६० मिमी पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी यावर्षी चांगली राहिली आहे. येणाऱ्या रब्बी हंगामासाठी ही पाण्याची पातळी लाभदायक ठरणार आहे. रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र तसेच फळबाग लागवड क्षेत्रातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. - शरद धर्माधिकारी