भोर-महाड रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:08 IST2025-09-03T20:08:03+5:302025-09-03T20:08:22+5:30
शिंदेवाडीपासून मोऱ्या, गटारे आणि पुलाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचले

भोर-महाड रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त
भोर : भोर - महाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपूर्ण गटारे, मोऱ्या आणि पुलाची कामे यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहन चालवणे अवघड झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शिंदेवाडी ते भोर हद्द आणि भोर - महाड रस्त्यावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. शिंदेवाडीपासून मोऱ्या, गटारे आणि पुलाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. यामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचले असून, वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. भोरपासून महाड नाका ते महांगीर ओढ्यापर्यंतचा रस्ता खराब आहे. येथील पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे. सर्व्हिस रस्त्याचीही दुरवस्था झाली असून, रात्रीच्या वेळी कोणतेही सूचना फलक नसल्याने वाहने घसरून ओढ्यात पडण्याची भीती आहे.
वेणवडी, आंबेघर, वाटार, साळेकरवस्ती आणि आपटी येथील मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. आंबेघर ते निगुडघरदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. यामुळे लहान - मोठे अपघात होत आहेत. देवघरपासून वरंधा घाटापर्यंतच्या रस्त्यावर चिखलामुळे वाहने अडकत असून, स्थानिक नागरिक आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास होत आहे. बुवासाहेबवाडी ते निरानदी पूल आणि बाजार समिती ते रामबागदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना आणि स्थानिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर सूचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे. अपूर्ण कामे आणि खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, प्रवासाचा वेळही वाढला आहे. रस्त्यावरील खड्डे तातडीने भरणे आणि अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन आणि ठेकेदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जोपर्यंत ही कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांचा त्रास कायम राहणार आहे.