भरणेंचा बालेकिल्ला आरक्षणाच्या भोवऱ्यात; बोरी-वालचंदनगरमध्ये अनु. जाती महिलांची चुरशीची लढत..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:39 IST2025-11-10T15:38:32+5:302025-11-10T15:39:22+5:30
इंदापूर तालुक्याचे पंचायत समिती सभापतिपद हेदेखील अनुसूचित जातिजमातीसाठी आरक्षित असल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे.

भरणेंचा बालेकिल्ला आरक्षणाच्या भोवऱ्यात; बोरी-वालचंदनगरमध्ये अनु. जाती महिलांची चुरशीची लढत..!
वालचंदनगर : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कायम वर्चस्व राहिलेल्या बोरी-वालचंदनगर जिल्हा परिषद गटात यंदा अनुसूचित जातिजमाती महिला वर्गासाठी आरक्षण पडले आहे. पूर्वीच्या कळस वालचंदनगर जिल्हा परिषद गटामधील काझड हे गाव भिगवन, शेटफळगडे या जिल्हा परिषद गटाला जोडले गेले आहे. इंदापूर तालुक्याचे पंचायत समिती सभापतिपद हेदेखील अनुसूचित जातिजमातीसाठी आरक्षित असल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे.
याच जिल्हा परिषद गटांमध्ये निवडून येत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी इंदापूर तालुक्यात आणला होता. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा बालेकिल्ला आहे. या गटातील नऊ ग्रामपंचायतीपैकी आठ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. कृषिमंत्री भरणे यांचा हा बालेकिल्ला असल्याने या गटातून जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जातिजमाती महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्याचप्रमाणे वालचंदनगर गण हाही अनुसूचित जातिजमाती महिला वर्गासाठी आरक्षित आहे. इंदापूर तालुक्याचे पंचायत समिती सभापतिपद हेदेखील अनुसूचित जातिजमातीसाठी आरक्षित असल्याने अनेकांनी या गटातून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे.
कळस-वालचंदनगर जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत कळस येथील माजी आमदार स्व. गणपतराव पाटील यांच्या सून वैशाली पाटील व घोलपवाडी येथील माजी आमदार स्व. राजेंद्रकुमार घोलप यांच्या सून वंदनादेवी घोलप यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये वैशाली पाटील या २६०० अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. पंचायत समिती, वालचंदनगर गणातून राष्ट्रवादीच्या पवार, भरणे गटाच्या डॉ. शैला दत्तात्रय फडतरे व कळस गणातून याच गटाच्या निर्मला लोंढे विजयी झाल्या होत्या. बोरी वालचंदनगर जिल्हा परिषद गटावर अनेक वर्षांपासून कळस येथील प्रतापराव पाटील व वैशाली पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत असणारे जंक्शन येथील उद्योजक वसंत मोहोळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. या गटातील निवडणुकीत कृषिमंत्री भरणे यांचे निकटवर्तीय कळस येथील प्रतापराव पाटील, जंक्शन येथील राजकुमार भोसले, उद्योजक वसंत मोहोळकर, रणगाव येथील सरपंच योगेश खरात, वालचंदनगर येथील पदाधिकारी कळंब येथील माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे, बाळासाहेब डोंबाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय फडतरे, वालचंद विद्यालयाचे संस्था-अध्यक्ष रामचंद्र कदम यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.