बारामतीत रेशीम कोषाची चार महिन्यांत ३ कोटी ४५ लाखांवर उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:54 IST2025-09-03T19:54:45+5:302025-09-03T19:54:57+5:30

मागील महिन्यात १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला.

pune news baramati silkworm colony turnover crosses Rs 3.45 crore in four months | बारामतीत रेशीम कोषाची चार महिन्यांत ३ कोटी ४५ लाखांवर उलाढाल

बारामतीत रेशीम कोषाची चार महिन्यांत ३ कोटी ४५ लाखांवर उलाढाल

बारामती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष बाजारात विक्रमी उलाढाल होत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र राज्यातील व्यापाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे. दि. १ एप्रिल ते २५ ऑगस्ट या कालावधीत ४ कोटी ४५ लाख ७७ हजार ७२४ रुपयांची उलाढाल झाली आहे. ८८४ शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या ७२ टन ३४५ किलो रेशीम कोषांना प्रतिकिलो ३०० ते ६५० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील महिन्यात १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला.

एप्रिल २०२२ पासून सुरू झालेल्या बारामती रेशीम कोष बाजारपेठेने २५ ऑगस्टपर्यंत तीन हजार ६९२ शेतकऱ्यांना आपले २८६ टन ३७७ किलो रेशीम कोष विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत १३ कोटी ८८ लाख ९२ हजार ४६८ रुपयांची एकूण उलाढाल झाली आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर यासह राज्यभरातील शेतकरी या बाजारात आपले कोष विक्रीसाठी आणत आहेत. १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला, जे ई-नाम प्रणालीच्या वेबसाइटवर नोंदणीकृत आहेत. बारामतीत रेशीमची बाजारपेठ देशपातळीवर विस्तारली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथील परिसरातून बारामतीत कोष आणण्यात येत आहेत.

शेतीला प्रोत्साहनासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू केलेल्या लखपती रेशीम कोष शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी लखपती शेतकऱ्याचा बहुमान मिळवला आहे. पारंपरिक रेशीमला फाटा देत लखपती रेशीम कोष शेतकरी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

बाजार समिती शेतकरी आणि रिलर्स यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांनी रेशीम कोष ग्रेडिंग आणि स्वच्छ करून आणल्यास त्यांना जास्त दर मिळण्याची शक्यता आहे.  

बारामती रेशीम बाजारात ई-नाम प्रणालीद्वारे ऑनलाइन लिलाव आणि पारदर्शक व्यवहार होतात. अचूक वजन आणि व्यवस्थित विक्री प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना इतर राज्यांतील बाजारांप्रमाणे चांगले दर मिळत आहेत. शेतकऱ्यांना ग्रेडिंग आणि स्वच्छ केलेले रेशीम कोष बाजारात आणण्याचे आवाहन सभापती विश्वास आटोळे, उपसभापती रामचंंद्र खलाटे यांनी केले आहे. 

शासनाच्या पाठिंब्याने बारामती मुख्य यार्डमध्ये रेशीम कोष बाजारपेठ आणि कोषोत्तर प्रक्रिया व प्रशिक्षण इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे भविष्यात शेतकरी आणि रिलर्स यांना सर्व आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, बारामती रेशीम बाजार एक भव्य आणि अग्रगण्य बाजारपेठ बनणार आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक व्यापाऱ्यांना माल विकावा असे आवाहन करण्यात येत आहे.  - अरविंद जगताप, सचिव, बारामती बाजार समिती.

Web Title: pune news baramati silkworm colony turnover crosses Rs 3.45 crore in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.