बारामती नगरपरिषदेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा;दोन मजली इमारतीचे बांधकाम केले जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:15 IST2025-08-27T17:14:52+5:302025-08-27T17:15:07+5:30
या बांधकामाबाबत शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी यांनी अहवाल सादर केला.

बारामती नगरपरिषदेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा;दोन मजली इमारतीचे बांधकाम केले जमीनदोस्त
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.२६) रुई परिसरातील दोन मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई केली. प्रशासनाने ही इमारत जमीनदोस्त केली आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी माहिती दिली.
याबाबत भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दीतील रुई येथील गट नं. ३६/१, प्लॉट नं. १ या जागेतील अनधिकृत बांधकामाबाबत ३१ जानेवारी रोजी संबंधितांना बांधकाम परवाना देण्यात आलेला होता. या बांधकामाबाबत शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी यांनी अहवाल सादर केला.
त्यानुसार, या जागेतील संबंधितांचे अनधिकृत बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमानुसार अनधिकृत बांधकाम एक महिन्याच्या आत काढून टाकण्याबाबत नोटीस देण्यात आली होती, तसेच बांधकामधारकांचे इंजिनीअर यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त, बांधकामाचे वर्किंग नकाशे, देखरेख, स्ट्रक्चरल ड्राॅइंग या वा इतर कोणत्याही बाबी बांधकामधारकास देण्यात आल्या नसल्याने मंजूर नकाशे व्यतिरिक्त झालेल्या बांधकामास नियमावलीनुसार कार्यवाही करण्यास हरकत नसल्याचे पत्रही २५ जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानंतरही हे अनधिकृत बांधकाम सुरू होते. त्यामुळे संबंधित जागेतील अनधिकृत बांधकाम नगरपरिषदेकडून आज काढण्यात आले.
दरम्यान, शहरात दिलेल्या बांधकाम परवानगी प्रमाणे बांधकाम करावे. त्यानंतरही कोणी अनधिकृतपणे बांधकाम केल्यास अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिला आहे.