झेडपी, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उरण्यासाठी इच्छुकांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:04 IST2025-08-07T16:03:37+5:302025-08-07T16:04:04+5:30

खेड तालुक्यात रक्षाबंधनानिमित्त महिलांना मिठाई वाटप; विविध मार्गांनी मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, अनेक उमेदवार आपल्या पत्नीला रिंगणात उतरवण्याची शक्यता

pune news aspirants rush to remain in the fray for ZP, Panchayat Samiti elections | झेडपी, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उरण्यासाठी इच्छुकांची लगबग

झेडपी, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उरण्यासाठी इच्छुकांची लगबग

राजगुरुनगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांना दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, राजगुरुनगर परिसरातील वाफगाव - रेटवडी जिल्हा परिषद गटात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आजी - माजी आणि नवीन उमेदवार गावोगावी फिरून मतदारांशी संपर्क साधत आहेत. गावकऱ्यांना नमस्कार करणे, त्यांच्या सुख - दु:खात सहभागी होणे आणि रक्षाबंधनानिमित्त महिलांना मिठाई वाटप करणे, अशा विविध मार्गांनी उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

 
गावोगावी फ्लेक्स आणि मिठाई वाटप -

वाफगाव - रेटवडी गटात अनेक इच्छुकांनी गावात फ्लेक्स लावून शुभेच्छा देण्याचा सपाटा लावला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने उमेदवारांनी गावातील महिलांना मिठाईचे पुडे वाटप करून त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष लढण्याची तयारीही अनेकांनी सुरू केली आहे.
 

सामाजिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग -
उमेदवार गावातील छोट्या - मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. गावात मृत्यू कार्य असल्यास अंत्यसंस्कारापर्यंत उपस्थित राहणे, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे, अशा मार्गांनी इच्छुक मतदारांशी जवळीक साधत आहेत. गटातून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, जि. प.चे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे, बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, खरपुडीचे सरपंच जयसिंग भोगाडे, माधवी अमर शिंदे पाटील, दीप्तीताई भोगाडे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक गणेश थिगळे, अश्विनी पाचारणे, माजी सरपंच अनिताताई मांजरे यांचा समावेश आहे. जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली, तर अनेक उमेदवार आपल्या पत्नींना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

पंचायत समिती गणातील इच्छुक -

वाफगाव गणात सातकर स्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण, गाडकवाडीचे माजी सरपंच वैभव गावडे आणि ज्ञानेश्वर ढेरंगे यांनी तयारी सुरू केली आहे. रेटवडी गणात गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, वाकळवाडीचे सरपंच नरेंद्र वाळुंज, राक्षेवाडीचे माजी सरपंच मच्छिंद्र राक्षे यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे.
 

निवडणुकीचे बदलते समीकरण -
इच्छुक उमेदवार कोणत्याही पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून, तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी दर्शवत आहेत. यामुळे निवडणुकीत तोडफोडीचे राजकारण आणि नवीन समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. नवीन आणि युवा उमेदवारही या रिंगणात उतरले असून, त्यांनी आतापासूनच गावकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत मतदारांची मने जिंकण्यासाठी उमेदवारांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, येत्या काही दिवसात प्रचाराला अधिकच वेग येणार आहे.

Web Title: pune news aspirants rush to remain in the fray for ZP, Panchayat Samiti elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.