पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग तळेगावपासूनच,लवकर भूसंपादन;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:25 IST2025-07-26T11:24:28+5:302025-07-26T11:25:37+5:30

‘रेल्वेमार्ग करताना तळेगावपासून चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास व अहिल्यानगर असा केला जाणार आहे.

Pune news Ahilyanagar railway line from Talegaon itself, land acquisition soon; information from Deputy Chief Minister Ajit Pawar | पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग तळेगावपासूनच,लवकर भूसंपादन;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे-अहिल्यानगर रेल्वेमार्ग तळेगावपासूनच,लवकर भूसंपादन;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे : पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन नवीन रेल्वेमार्गांची आखणी करण्यात येत आहे. पुणे ते अहिल्यानगर या नवीन मार्गासाठी तळेगाव ते उरुळी कांचन या ७५ किलोमीटरच्या मार्गासाठी उरुळी कांचन येथे शंभर हेक्टरवर मेगा टर्मिनल उभारण्यात येत आहे. यासंदर्भात रेल्वे विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हा रेल्वेमार्ग पुढील चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या पुणे ते अहिल्यानगर या रेल्वेमार्ग संदर्भातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘रेल्वेमार्ग करताना तळेगावपासून चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास व अहिल्यानगर असा केला जाणार आहे. यात एकूण ८ स्टेशन असतील. यामुळे चाकण, शिक्रापूर, रांजणगाव तसेच अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा ७५ किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येणार आहे. त्यानंतर उरुळी कांचन येथे शंभर हेक्टरवर मेगा टर्मिनल उभारण्यात येणार आहे. त्यापुढे हा मार्ग सोलापूर मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्यात यावे, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना योग्य तो दर दिला जाईल. संपादन लवकरच सुरू करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी तळेगाव येथे नवीन तळेगाव व उरुळी कांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने तळेगावहून मिरज मार्गाला जोडणारा नवीन मार्गदेखील प्रस्तावित केला आहे. हे काम पुढील पाच वर्षांत करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील भूसंपादन ही लवकरच सुरू करण्यात येईल. या कामामुळे पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. राज्य सरकारकडून पुण्यासाठी दोन रिंगरोड तयार करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे ताथवडे येथून सातारा रस्त्याला रस्त्याला जोडणारा नवा रुंद मार्ग तयार करण्यात येत आहे. या रस्त्यातील भुयारी मार्गदेखील रुंद केले जाणार आहेत. चिंचवड येथील पादचारी पूल काढून नव्याने ४० कोटी रुपये खर्च करून नवीन पूल तयार करण्यात येणार आहे. बंगळुरू महामार्गावरील मुकाई चौक ते मुळा नदी वाकडपर्यंत २४ मीटर रुंदीचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या कामालादेखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title: Pune news Ahilyanagar railway line from Talegaon itself, land acquisition soon; information from Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.