सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:21 IST2025-08-06T19:21:27+5:302025-08-06T19:21:59+5:30
- पाठपुरावा करूनही यूजीसीकडून अद्याप मंजुरी नाही ; ‘बार्टी’चाही मिळेना प्रतिसाद, विद्यापीठ पातळीवर प्रक्रिया

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे :विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या (यूजीसी) मान्यतेने सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा केंद्राने देशाला अनेक अधिकारी दिले आहेत. मात्र, २०२३ पासून यूजीसीकडून मान्यता न मिळाल्याने या केंद्रातील अपेक्षित भरती थांबली आहे. पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यापीठच काही शुल्क आकारून विद्यार्थी भरती करत आहे, याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती या केंद्राचे समन्वयक डाॅ. सय्यद फजल यांनी दिली. यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यताही मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांना राहण्याची साेय तर हाेतेच, त्याच बराेबर वाचनासाठी संदर्भग्रंथ सहज उपलब्ध हाेतात आणि तज्ज्ञ मंडळीचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थीसुद्धा स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन यशाला गवसणी घालू शकताे. अतिशय दुर्गम भागातील, गाव खेड्यातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा केंद्राचा माेठा आधार झाला असून, पुढेही हाेणार आहे. त्यामुळे यूजीसीने या केंद्राला पुढे सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, विद्यापीठाने यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. त्याच बराेबर बार्टीसारख्या संस्थांचा यासाठी पाठबळ मिळाल्यास अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण हाेतील.
याबाबत विचारणा केली असता समन्वयक डाॅ. सय्यद फजल म्हणाले, मागील दाेन वर्षांपासून आम्ही स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयाेगाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहाेत, परंतु त्यांचा कसलाच प्रतिसाद मिळत नाही. याबाबत केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर मुळे हेदेखील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मंजुरी मिळेल तेव्हा मिळेल, ताेपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये म्हणून विद्यापीठ पातळीवर केंद्र चालवले पाहिजे, यादृष्टीने आम्ही काम करीत आहाेत. तसेच बार्टीने आम्हाला मदत करावी, अशी अपेक्षा आहे. याबाबत बार्टीचे संचालक सुनील वारे यांच्याशी संपर्क केेला असता हाेऊ शकला नाही.