भाजपच्या दबावापुढे प्रशासन झुकले; ढोल-ताशा पथकांची सणस मैदानावर घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:50 IST2025-07-18T09:50:32+5:302025-07-18T09:50:51+5:30
- परवानगी दिली नसल्याचे आयुक्तांचे स्पष्टीकरण

भाजपच्या दबावापुढे प्रशासन झुकले; ढोल-ताशा पथकांची सणस मैदानावर घुसखोरी
पुणे : महापालिकेच्या सणस मैदान परिसरात ढोल पथकांनी घुसखोरी करत मैदान, पाण्याची टाकी व प्रवेशद्वारावर वादनाच्या सरावासाठी शेड उभारल्या आहेत. कोणत्याही मैदानांवर पथकांना परवानगी दिली जाणार नाही, असे म्हणणारे महापालिका प्रशासन भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावापुढे झुकल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत महापालिका आयुक्तांना विचारल्यानंतर त्यांनी कोणत्याही पथकाला परवानगी दिली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. मात्र, कारवाईबाबत त्यांनी सावध पवित्रा घेत बोलणे टाळले.
यंदा गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा पथकांचा वादन सराव शहरात विविध ठिकाणी सुरू आहे. हा सराव नदीपात्रातील रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत, घाटांसह शहर व उपनगरांसह मोकळ्या व बंदिस्त मिळकतींमध्ये सुरू आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून महापालिकेच्या सारसबागेजवळील सणस मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार, बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर, नेहरू स्टेडियमचे प्रवेशद्वार तेथील कबड्डी मैदान आदी ठिकाणी ढोल पथके घुसखोरी करून सराव करत आहेत. तसेच महापालिकेच्या इतर मैदानंवरही अशाचप्रकारे घुसखोरी केली जात आहे.
या घुसखोरीमुळे खेळाडूंना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या क्रीडा विभागाने ढोल पथकांचे सणस मैदानावरील ६, नेहरू स्टेडियम परिसरातील ४, सप्तगिरी बालाजी क्रीडांगण, घोरपडी येथील १ आणि हडपसर हँडबॉल स्टेडियम, माळवाडी येथील १ असे बारा प्रस्ताव फेटाळले होते. तसेच सांस्कृतिक विभागानेही गणेश कला व क्रीडा मंच परिसरात परवानगी देण्यास असमर्थता दर्शविली.
यानंतर बुधवारी भाजप शहराध्यक्ष धीर घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन ढोल-ताशा पथकांच्या वादन सरावासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवातील ढोल पथकांचे महत्त्व लक्षात घेऊन सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र, मैदानांवर परवानगी दिली जाणार नाही. कोणाला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले होते.
मात्र, त्यानंतर गुरुवारी सकाळी महापालिकेच्या परवानगीची वाट न पाहता, ढोल पथकांनी सणस मैदान परिसरात घुसखोरी करत सरावासाठी शेड मारण्याचे काम हाती घेतले. पथकांनी मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारासह येथील बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर शेड उभारण्याचे काम हाती घेतले. याबाबतचे फोटो महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर त्यांनी यावर भाष्य करणे टाळत माहिती घेतो, अशी उत्तरे देत फोन कट केले.
रुग्णांना सहन करावा लागणार त्रास -
सणस मैदानाच्या परिसरात दोन रुग्णालये आहेत ढोल पथकांचे वादन सराव सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत चालतात. या वादनाचा त्रास रुग्णालयांतील रुग्णांना होतो. याबाबत मागील वर्षी रुग्णालयांनी महापालिका व पोलिस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. त्यानंतर आता यंदाही येथे सराव शेड उभे केल्याने यंदाही रुग्णांना त्रास सहन करावा लागणार आहे.
रुग्णांना सहन करावा लागणार त्रास
सणस मैदानाच्या परिसरात दोन रुग्णालये आहेत ढोल पथकांचे वादन सराव सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत चालतात. या वादनाचा त्रास रुग्णालयांतील रुग्णांना होतो. याबाबत मागील वर्षी रुग्णालयांनी महापालिका व पोलिस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. त्यानंतर आता यंदाही येथे सराव शेड उभे केल्याने यंदाही रुग्णांना त्रास सहन करावा लागणार आहे
कोणालाही परवानगी दिलेले नाही
ढोल पथकांना मैदानांच्या परिसरात परवानगी दिली जाणार नाही, असे शिष्टमंडळाला आधीच स्पष्ट सांगितले आहे. त्यानंतरही अतिक्रमण करण्यात येत असेल तर मी उद्या पाहणी करून कार्यवाही करतो. मात्र, अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही. - नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.