आळंदीतील देहूफाटा परिसरात बिबट मादीसह दोन बछड्यांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 20:21 IST2025-07-25T20:21:10+5:302025-07-25T20:21:10+5:30
शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरून दर्शन झाले. बिबट्यांने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला.

आळंदीतील देहूफाटा परिसरात बिबट मादीसह दोन बछड्यांचे दर्शन
आळंदी : आळंदीतील देहूफाटा परिसरात बिबट मादीसह बछड्यांचे दर्शन घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले व ग्रामस्थांनी केली आहे.
देहूफाटा येथील शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरून दर्शन झाले. बिबट्यांने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला. या घटनेनंतर वनविभाग आणि रेसक्यू टीमशी संपर्क केला असता ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांना दाभाडेंच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. तसेच दोन ट्रॅप कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत.
शेतामध्ये जाताना चार ते पाचजणांनी समूहाने जाणे, हातात काठी घेऊन जाणे, एकट्याने शेतात जाऊ नये तसेच सायंकाळी कामाव्यतिरिक्त जास्त वेळ थांबू नये, घरी येताना समूहाने येणे अशा सूचना वनविभाग अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, सध्याच्या दिवसात शेतात कामांची लगबग सुरू असल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, भाजप शहराध्यक्ष भागवत आवटे, वनविभागाचे वनाधिकारी अशोक गायकवाड, लक्ष्मण टिंगरे, रेस्क्यू टीमचे श्रीनाथ चव्हाण, डॅा. सायली पिलाणे, सुभाष दाभाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.