जिल्ह्यातील २८ हजार एकल महिलांना हवा मोफत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:57 IST2025-11-04T12:53:38+5:302025-11-04T12:57:39+5:30
या उपक्रमांतर्गत एकल महिलांना सातबाऱ्यावर नाव नोंदविणे, घरपट्टी व घरकुलाच्या कागदपत्रांवर नाव नोंदविणे, रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार

जिल्ह्यातील २८ हजार एकल महिलांना हवा मोफत उपचार
पुणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये जिल्ह्यात एक लाख नऊ हजार एकल महिलांची नोंद झाली. विशेष म्हणजे या सर्व्हे मध्ये २८ हजार ७६१ एकल महिलांना आरोग्य तपासणी व मोफत उपचाराची गरज असल्याचे समोर आले आहे. तर ५४ हजार ८९१ एकल महिलांना साक्षर करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील एकल महिलांना सबलीकरण व आत्मनिर्भरतेच्या प्रवासात साथ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून कोणतीही नवीन योजना न आणता, विद्यमान शासकीय योजनांमधून एकल महिलांना जास्तीत जास्त मदत मिळावी या उद्देशाने ‘माझे अस्तित्व’ हा विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत एकल महिलांना सातबाऱ्यावर नाव नोंदविणे, घरपट्टी व घरकुलाच्या कागदपत्रांवर नाव नोंदविणे, रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेने केलेल्या सर्व्हेमध्ये तब्बल २८ हजार ७६१ एकल महिलांना आरोग्य तपासणी आणि मोफत उपचाराची गरज असल्याचे समोर आले आहे. २२ हजार महिलांना हक्काची निवाऱ्याची आवश्यकता आहे. तर कृषी आधारित व कृषी पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी ११ हजार ९०४ महिलांना मदतीची आवश्यकता असून ५९२७ महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज आहे.
तालुकानिहाय एक महिलांची संख्या
खेड ११८३३ आंबेगाव ११८२५
इंदापूर ९९८४
बारामती ९७५६
दौंड ९२४९
पुरंदर ८८८९
मावळ ७८६१
जुन्नर ७५३७
हवेली ६६६९
मुळशी ५५३७
शिरुर ५११३
भोर ५०६५
राजगड (वेल्हे ) १७०१
एकूण १०१००९
वैवाहिक स्थिती सांख्या
विधवा ९०१६९
परितक्त्या ६८९८
घटस्फोटीत १६६४
अविवाहित १६४७
अनाथ ६३१
एकूण १०१००९
५४ हजार महिला निरक्षर
एकल महिलांच्या सर्व्हेमध्ये ५४ हजार ८९१ एकल महिलांना साक्षर करण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. इयत्ता १ ली ते सातवीपर्यंत २९ हजार १०८ महिलांचे शिक्षण झाले आहे, तर ८ वी ते १० वीपर्यंत १२ हजार १३२, १२ वी पास ३ हजार ५२, पदवधीर १ हजार ४५७, पदव्युत्तर ३६९ महिला आहेत.
एकल महिलांसाठी सर्वात जास्त प्रामुख्याने गरजेची वाटणारी बाब
आरोग्य तपासणी व मोफत उपचार : २८७६१
इतर : २३९४६
घरकूल उपलब्ध करून देणे : २२१०२
कृषी अधारित व पुरक व्यवसाय सुरू करणे : ११९०४
रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण : ६०६९
मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती किंवा मदत : ५९२७
बचतगट सदस्य करून देणे किंवा मदत उपलब्ध करून देणे : १५०९
आर्थिक ६७.