लम्पी चर्मरोगाचे जिल्ह्यात १५ बळी;६० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:44 IST2025-07-24T12:43:53+5:302025-07-24T12:44:13+5:30
प्रतिबंध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

लम्पी चर्मरोगाचे जिल्ह्यात १५ बळी;६० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण
पुणे : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाची बाधा वाढली आहे. आतापर्यंत ९०६ जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. यातील ५९१ जनावरे औषधोपचाराने बरी झाली असून १५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यामध्ये ३०० जनावरांवर उपचार सुरू आहेत. शिरुर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांमध्ये या रोगाचा प्रसार जास्त आहे. त्या ठिकाणी संसर्ग केंद्राच्या पाच किलोमीटर परिसरामध्ये लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये ८ लाख ४६ हजार ७४५ गोवंशीय पशुधन असून आतापर्यंत ५ लाख ८० हजार ६०० लस मात्रा वितरित केल्या असून ५ लाख ७० हजार ७९१ जनावरांचे (सुमारे ६० टक्के) लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
लम्पी चर्मरोगाचा फैलाव रोखण्यासाठी मनुष्यबळ कमी असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांची पर्यायी नियुक्ती करावी, गोठा स्वच्छता, जैवसुरक्षा व विविध निर्जंतुक औषधांची फवारणी करण्याच्या डुडी यांनी सूचना दिल्या.
पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार म्हणाले, ‘सध्या जिल्ह्यात रोगाचा सौम्य प्रादुर्भाव दिसून आला असून उपचारानंतर बहुतांश जनावरे बरी होत आहेत. सर्व शासकीय संस्थांमध्ये लम्पी चर्मरोगावर उपचार करण्यासाठी आवश्यक औषध पुरवठा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील ५, केंद्र पुरस्कृत योजनेतील १ फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे पशुपालकांच्या दारात उपचार करण्यात येत आहे. पशुपालकांनी लम्पी चर्मरोग बाधित पशुधनास उपचार करण्यासाठी १९६२ या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तत्काळ व योग्य औषधोपचार केले आणि बाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केल्यास या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते, असे गेल्या दोन वर्षांत निदर्शनास आले आहे.’
ज्या ठिकाणी रोगाचा उद्रेक दिसून येत आहे व ज्या पशुधनास लसीकरण झालेले नाही, त्यासाठी तालुकानिहाय लस मागणी घेण्यात आली असून नव्याने लसमात्रा खरेदी करून पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही परिहार म्हणाले. यावेळी बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जिल्ह्यातील सर्व सहायक आयुक्त व तालुक्याचे अधिकारी उपस्थित होते.